लोयाप्रकरणामागे काँग्रेसचा अदृष्य हात : भाजप

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 एप्रिल 2018

ज्यांनी न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरणाची चौकशी करण्यासाठी याचिका दाखल केली, तो अदृष्य हात आहे. हा अदृष्य हात काँग्रेस आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा आहे.

- डॉ. संबित पात्रा, प्रवक्ते भाजप

नवी दिल्ली : जे लोक स्वत:च्या स्वार्थासाठी न्यायव्यवस्थेचे राजकारण करत आहेत. अशा लोकांचा चेहरा आता समोर आला आहे. न्या. लोयाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नावेही घेतली. त्यांच्यावर अविश्वास व्यक्त करण्यात होता. तसेच ज्यांनी न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरणाची चौकशी करण्यासाठी याचिका दाखल केली, तो अदृष्य हात आहे. हा अदृष्य हात काँग्रेस आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा आहे. त्यामुळे राहुल गांधीनी यावर माफी मागायला हवी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी केली.

Justice loya

न्यायमूर्ती बी. एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) चौकशी केली जावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज (गुरुवार) फेटाळली. या याचिकेमध्ये सत्याचा अभाव आहे आणि न्यायव्यवस्थेची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न आहे, असे निरीक्षणही सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले. गुजरातमधील सोहराबुद्दीन चकमकप्रकरणी न्या. लोया यांच्यासमोर खटल्याची सुनावणी सुरू होती. या खटल्यात भाजपचे विद्यमान अध्यक्ष अमित शहा आरोपी होते. 2014 च्या डिसेंबरमध्ये न्या. लोया यांचा मृत्यू झाला. न्या. लोया यांचा मृत्यू संशयास्पद आहे, असा दावा काही जणांनी केला होता. मात्र, न्या. लोया यांचा मृत्यू नैसर्गिक होता, याविषयी कोणतीही शंका नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने आजच्या निकालात स्पष्ट केले. 

न्यायालयाच्या या निकालानंतर भाजपकडून काँग्रेसवर जोरदार निशाणा साधण्यात आला. डॉ. पात्रा म्हणाले, न्यायामूर्ती लोया मृत्यूप्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका ज्यांनी दाखल केली होती, ते अदृष्य हात आहेत. फक्त राजकीय स्वार्थापोटी अशी मागणी केली जात होती. हा अदृष्य हात काँग्रेस आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचाच आहे. असा आरोप करणाऱ्यांची मान शरमेने खाली जायला हवी. जगातील सर्वात भक्कम न्यायव्यवस्था असलेल्या देशाची त्यांनी माफी मागायला हवी. काँग्रेसकडे आता सत्ता नसल्याने ते असे काम करत आहेत, असेही पात्रा म्हणाले.  

Web Title: Justice Loya Case BJP Sambit Patra Criticizes Congress and Rahul Gandhi