आपण निवडून आल्यास कर्फ्यू लावणार - सुरेश राणा

पीटीआय
मंगळवार, 31 जानेवारी 2017

या निवडणुकीनंतर राज्यात भाजपचे सरकार आले, तर येथील जनतेला नव्हे, तर दहशत माजविणाऱ्यांना राज्य सोडून जावे लागेल

मुझफ्फरनगर - आगामी विधानसभा निवडणुकीत आपण पुन्हा निवडून आलो, तर कैराणा, देवबंद तसेच मोरादाबाद येथे संचारबंदी लागू करणार, असे वादग्रस्त विधान भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश राणा यांनी केले आहे. या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून त्यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर राणा यांनी आज सारवासारव करत हे विधान राज्यात अराजकता माजविणाऱ्यांसाठी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ""राज्याच्या पश्‍चिमी भागातून अनेक कुटुंबे स्थलांतर करण्याच्या तयारीत आहेत. सगळीकडे अराजकतेचे वातावरण असून, गुंड व माफियांनी येथील जनतेला सळोकीपळो करून सोडले आहे. या निवडणुकीनंतर राज्यात भाजपचे सरकार आले, तर येथील जनतेला नव्हे, तर दहशत माजविणाऱ्यांना राज्य सोडून जावे लागेल,''

राणा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन झाले असून याप्रकरणी त्यांच्याविरोधात कलम 505 व 125 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती अधिकारी सुनीलकुमार त्यागी यांनी बोलताना दिली आहे. गेल्या वर्षी भाजप खासदार हुकूम सिंह यांनी स्थलांतर केलेल्या सुमारे 300 हिंदू कुटुंबांची यादी उघड केली होती. सत्ताधारी समाजवादी पक्ष याप्रकरणी कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

राणांकडून आचारसंहितेचेही उल्लंघन
2013 मध्ये झालेल्या मुझफ्फरनगर दंगलीमागे हात असल्याचा संशय असलेले सुरेश राणा यांनी या निवडणुकीत आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा प्रकार समोर आला आहे. शामली जिल्ह्यातील हाती करोंडा या गावात त्यांनी घेतलेली सभा व "रोड शो'साठी राणा यांनी कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नसल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

संचारबंदी लागू करून राणा यांना नक्की काय साध्य करायचे आहे. त्यांनी पुरेसे शिक्षण घेतलेले दिसत नाही. यामुळे संचारबंदी केव्हा लागू करतात, हे कदाचित त्यांना माहिती नसेल. हुकूम सिंह यांनी प्रसिद्ध केलेली यादी चुकीची होती.
- जुही सिंह, सप नेत्या

वादग्रस्त वक्तव्ये करण्यास पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी मनाई केली असून, राणा यांनी केलेल्या वक्तव्याशी पक्षाचा संबंध नाही. पक्षाला त्यासाठी जबाबदार धरता येणार नाही.
- रिटा बहुगुणा जोशी, भाजप नेत्या