कपिल मिश्रा हे भाजपचे एजंट - आप

वृत्तसंस्था
सोमवार, 8 मे 2017

भ्रष्टाचाराला आप मध्ये कोणतेही स्थान नाही. निराधार आरोपांवर कोणीही राजीनामा देत नाही. अरविंद केजरीवालही राजीनामा देणार नाहीत. भाजपला फक्त आपला संपवायचे आहे. कपिल मिश्रांच्या माध्यमातून भाजपकडून षङयंत्र रचण्यात येत आहे.

नवी दिल्ली - मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आलेले आम आदमी पक्षाचे (आप) नेते कपिल मिश्रा हे भाजपचे एजंट असून, ते भाजपला जाऊन मिळाले आहेत. भाजपने आम्हाला नैतिकतेचे धडे देऊ नयेत, असे आप नेते संजय सिंह यांनी आज (सोमवार) सांगितले.

कपिल मिश्रा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप करत त्यांनी सत्येंद्र जैन या आप नेत्याकडून दोन कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी भाजपने केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या मागणीला उत्तर देताना आप नेते संजय सिंह यांनी भाजपवर पलटवार केला आहे.

संजय सिंह म्हणाले, की भ्रष्टाचाराला आप मध्ये कोणतेही स्थान नाही. निराधार आरोपांवर कोणीही राजीनामा देत नाही. अरविंद केजरीवालही राजीनामा देणार नाहीत. भाजपला फक्त आपला संपवायचे आहे. कपिल मिश्रांच्या माध्यमातून भाजपकडून षङयंत्र रचण्यात येत आहे. मंत्रीपद गेल्याने कपिल मिश्रा असे निराधार आरोप करत आहेत. त्यांनी केजरीवाल यांना भेटल्याची वेळ सांगावी. प्रत्येक आरोपाचे उत्तर केजरीवाल देणार नाहीत. सुडभावनेने केंद्र सरकार काम करत आहे.