'आप'नेत्याकडून केजरीवालांनी घेतले 2 कोटी: कपिल मिश्रा

वृत्तसंस्था
रविवार, 7 मे 2017

आप नेते सत्येंद्र जैन यांनी 50 कोटी रुपयांच्या जमीन व्यवहारासाठी केजरीवाल यांना दोन कोटी रुपये दिल्याचे मी स्वतः पाहिले आहे. त्यादिवशी मी रात्रभर झोपलो नाही. केजरीवाल यांनी त्यांच्या नातेवाईकांसाठी 50 कोटी रुपयांचा व्यवहार केला.

नवी दिल्ली - मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आलेले आम आदमी पक्षाचे नेते (आप) नेते कपिल मिश्रा यांची आज (रविवार) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप करत, आप नेते व आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडून केजरीवाल यांनी दोन कोटी रुपये घेतल्याचे मी स्वतः पाहिल्याचे मिश्रा यांनी म्हटले आहे.

राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर आज सकाळी मिश्रा यांनी नायब राज्यपाल अनील बैजल यांची भेट घेतली. राजघाट येथे जाऊन महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत कपिल मिश्रा यांनी केजरीवाल यांच्यावर जोरदार आरोप केले आहेत. दिल्लीच्या जल मंडळावरूही मिश्रा यांची उचलबांगडी करण्यात आली होती. 

कपिल मिश्रा म्हणाले, की आप नेते सत्येंद्र जैन यांनी 50 कोटी रुपयांच्या जमीन व्यवहारासाठी केजरीवाल यांना दोन कोटी रुपये दिल्याचे मी स्वतः पाहिले आहे. त्यादिवशी मी रात्रभर झोपलो नाही. केजरीवाल यांनी त्यांच्या नातेवाईकांसाठी 50 कोटी रुपयांचा व्यवहार केला. केजरीवाल यांनी मला राजकारणात असे चालतेच असे म्हटले होते. आम आदमी पक्षाचा मी संस्थापक सदस्य असून, मी पक्ष सोडून कोठेही जाणार नाही. भ्रष्ट नेत्यांना पक्षातून काढून टाका. 2004 मधील आंदोलनापासून ही पक्षाशी जोडला गेलो. मी कोठेही जाणार नाही, येथेच थांबेन आणि स्वच्छता करेन. मंत्री झाल्यावर शीला दीक्षित यांच्याबद्दलचा अहवाल मी मुख्यमंत्र्यांना दिला, पण या अहवालाचे नंतर काय झाले हे सर्वांना माहित आहे.