"हवाला'शी संबंध असल्यानेच केजरीवालांचा नोटाबंदीला विरोध

पीटीआय
शनिवार, 20 मे 2017

दिल्लीस्थित वकील रोहित टंडन यांच्याकडून आम आदमी पक्षाने निधी स्वीकारल्याचा आरोपही मिश्रा यांनी केला. आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली टंडन यांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने जप्त केली आहे

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे हवाला दलालांशी संबंध असल्यानेच त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध केला, असा नवा आरोप सरकारमधून हकालपट्टी झालेले नेते कपिल मिश्रा यांनी आज केला आहे.

केजरीवाल यांच्यावरील आरोपसत्र कपिल मिश्रा यांनी कायम ठेवले आहे. ते म्हणाले, ""केजरीवाल यांनी नोटाबंदीला कडाडून विरोध का केला? या निर्णयाविरोधात त्यांनी देशभर दौरे का केले? कारण, काळा पैसा बाळगणाऱ्या त्यांच्या निकटवर्ती मित्रांवर सरकारने छापे घातले. केजरीवाल यांची सर्व गुपिते माझ्याकडे असून ते लवकरच तिहार तुरुंगात असतील.''

दिल्लीस्थित वकील रोहित टंडन यांच्याकडून आम आदमी पक्षाने निधी स्वीकारल्याचा आरोपही मिश्रा यांनी केला. आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली टंडन यांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने जप्त केली आहे.

"आप'ला 2014 मध्ये दोन कोटी रुपये धनादेशाद्वारे मिळाले होते. हे पैसे कोणी दिले ते माहीत नसल्याचा "आप'चा दावा होता. मात्र, दिल्लीतील व्यावसायिक मुकेश कुमार यांनी हे पैसे दिल्लीमध्ये नोंद असलेल्या आपल्या चार कंपन्यांच्या मार्फत दिले असल्याचे काल (ता. 18) पत्रकारांना सांगितले होते. कुमार हे या कंपनीचे मालक नसून टंडन हेच खरे मालक असल्याचा आणि बनावट कंपन्यांद्वारे त्यांनी निधी दिल्याचा मिश्रा यांचा आरोप आहे. मुकेश कुमार यांना व्हॅट न भरल्याबद्दल 2013 मध्ये तत्कालीन दिल्ली सरकारने नोटीसही बजावली होती. मात्र, दहाच दिवसांनंतर केजरीवाल सत्तेवर आले आणि त्यानंतर कुमार यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे मिश्रा यांनी निदर्शनास आणून दिले.

व्हॅट भरण्यास पैसे नसलेल्या कुमार यांनी दोन कोटी रुपयांची देणगी कशी दिली, असा सवालही त्यांनी केला.