केजरीवालांनी केले 'ब्लॅक'चे 'व्हाईट' : मिश्रा

वृत्तसंस्था
रविवार, 14 मे 2017

केजरीवाल म्हणतात आम्ही केवळ गरीबांकडून देणगी घेतो, पण त्यांनी एका माणसाकडून 1 कोटी 10 लाख रूपयांची देणगी घेतली. एका रात्रीत एकत्रितपणे अनेक बोगस कंपन्यांकडून पैसा घेतले. 'आप'ने उघडपणे काळा पैसा पांढरा केला, निवडणूक आयोगाला चुकीची माहिती दिली.

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका रात्रीत अनेक बोगस कंपन्यांकडून देणगी स्वरुपात पैसा स्वीकारत काळ्या पैशाचे रुपांतर पांढऱ्या पैशात केले. केजरीवाल यांनी देशाशी विश्वासघात केल्याचाही आरोप, आम आदमी पक्षातून (आप) हकालपट्टी करण्यात आलेले नेते कपिल मिश्रा यांनी केला.

कपिल मिश्रा यांनी आज (रविवार) सकाळी पत्रकार परिषद घेत केजरीवाल यांच्यावर आरोप केले. मिश्रा यांनी यापूर्वीही केजरीवाल यांनी दोन कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला होता. आता त्यांनी आम आदमी पक्षाने देणगी स्वरुपात घेतलेल्या पैशांवर प्रश्न उपस्थित केला आहे. उपोषण करत असलेल्या मिश्रा यांना पत्रकार परिषद सुरू असतानाच चक्कर आल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.

मिश्रा यांनी केलेल्या आरोपात म्हटले आहे, की केजरीवाल म्हणतात आम्ही केवळ गरीबांकडून देणगी घेतो, पण त्यांनी एका माणसाकडून 1 कोटी 10 लाख रूपयांची देणगी घेतली. एका रात्रीत एकत्रितपणे अनेक बोगस कंपन्यांकडून पैसा घेतले. 'आप'ने उघडपणे काळा पैसा पांढरा केला, निवडणूक आयोगाला चुकीची माहिती दिली. अधिकाधिक बँक खाते अॅक्सिस बँकेतील असून याच खात्यातील पैसा नोटबंदीच्या काळात पांढरा करण्यात आला. केजरीवाल यांनी बनावट कंपन्यांच्या नावाने देणग्या वसूल केल्या. पैशाची गरज नसताना लोकांकडून 10-10 रूपये वसूल करण्यात आले, त्यासाठी बनावट कंपन्या स्थापन करण्यात आल्या. केजरीवालने आज राजीनामा दिला नाही तर कॉलर पकडून खुर्चीवरून ओढत नेऊन तुरूंगात डांबेल. केजरीवाल यांनी काही नैतिकता उरली असेल, तर आज राजीनामा देऊनच दाखवावा. पक्षाचे नेते कोणत्या कोणत्या देशाच्या दौऱ्यावर गेले असा प्रश्न विचारल्यावर कोणीच उत्तर देत नाही. केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाला खोटी माहिती देऊन अंधारात ठेवले. बँकेत 45 कोटी रूपये देणगी आली, वेबसाईटवर 19 कोटी दाखवली, 25 कोटी रुपये कुठे गेले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या परदेश दौऱ्याची माहिती द्यावी. सोमवारी सगळे पुरावे मी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सादर करणार आहे.