केजरीवाल वर्षभरात दोनदाच कार्यालयात

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 18 मे 2017

दिल्लीत गाजावाजा केलेल्या मोहल्ला क्‍लिनिकच्या नावाखाली जो तपशील समोर आला आहे तो पाहता केजरीवाल हे कायद्याची किंवा केंद्राची भीती बाळगत असतील ही शक्‍यताच नाही. साऱ्या कायद्यांना पायदळी तुडवून दिल्लीत सरकारचे काम चालले आहे

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे संपूर्ण वर्षभरात फक्त व फक्त दोनदाच आपल्या कार्यालयात गेले, असा आरोप त्यांचे ऐककाळचे प्रिय मंत्री व नुकतेच निलंबित केलेले कपिल मिश्रा यांनी केला आहे. मिश्रा यांनी लिहिलेल्या ताज्या ब्लॉगमध्ये भ्रष्टाचार व लाचखोरीच्या आरोपांबाबत केजरीवाल यांचे मौन हे निव्वळ गुन्हेगारी असल्याचाही हल्ला चढविला आहे.

"आप'मधून बरखास्तीनंतर सात मेपासून मी सांगितलेली एक गोष्ट तरी खोटी आहे का, हे सिद्ध करून दाखवा,'' असे आव्हान देताना मिश्रा यांनी या ब्लॉगमध्ये लिहिले आहे, ""आपल्या कार्यालयात क्वचित जाणारे केजरीवाल "सरकार-3' चित्रपट पाहण्यासाठी मात्र पहिल्याच दिवशी गेले होते. त्यांच्या नातेवाइकांवर छापे पडत आहेत, रोजच्या रोज त्यांच्या स्वतःच्या भ्रष्टाचाराची नवनवी प्रकरणे पुराव्यासह बाहेर येत आहेत आणि केजरीवाल घरातच बसून आहेत. मात्र "सरकार-3' पाहण्यासाठी त्यांचे आवर्जून जाणे हा मुंगेरीलाल के हसीन सपने, असाच प्रकार आहे.''

"केजरीवाल यांनी दिल्ली सचिवालयाच्या पायऱ्या यापूर्वी शेवटच्या कधी चढल्या आहेत हे त्यांना स्वतःला आठवत असेल तर दिल्लीकरांना सांगावे. दिल्लीकरांना अंदाजही नसेल, की त्यांचे मुख्यमंत्री गेल्या संपूर्ण वर्षभरात केवळ दोनदाच आपल्या कार्यालयात गेले आहेत. हे चांगल्या शासनकर्त्याचे उदाहरण असू शकते का ? सर्वांत कमी वेळा जनतेला भेटणारे, ज्यांच्याकडे एकही मंत्रालय नाही असे, सर्वांत कमी काम करणारे, सतत सुटीवरच राहणारे केजरीवाल हे देशातील एकमेव मुख्यमंत्री आहेत. भ्रष्टाचाराचे सर्वाधिक आरोप असलेले एकमेव मुख्यमंत्री म्हणूनही केजरीवाल देशात नवा विक्रम स्थापित करतील,'' असाही टोला त्यांनी लगावला आहे.

मिश्रा म्हणतात, ""दिल्लीत गाजावाजा केलेल्या मोहल्ला क्‍लिनिकच्या नावाखाली जो तपशील समोर आला आहे तो पाहता केजरीवाल हे कायद्याची किंवा केंद्राची भीती बाळगत असतील ही शक्‍यताच नाही. साऱ्या कायद्यांना पायदळी तुडवून दिल्लीत सरकारचे काम चालले आहे. त्यामुळेच माझ्या आईने त्यांना, "किमान देवाची तरी भीती बाळगा,' असा सल्ला दिला होता.''

गप्प राहाचा मंत्र
केजरीवाल आजकाल बंद खोलीत आपल्या सहकाऱ्यांना एकच मंत्र देत असतात व तो म्हणजे, ""गप्प राहा, काहीही बोलू नका. लोकांना घाबरू नका. लोक पंधरा, वीस दिवासांनी सारे विसरून जातात,'' असा गौप्यस्फोट करून कपिल मिश्रा यांनी म्हटले आहे, की दिल्लीकरांचा पैसा दिवसाढवळ्या लुटणाऱ्यांना जनता कसे विसरेल? केजरीवाल, जनता काही विसरत नाही व आता दिल्लीकरच बोलतील, असाही इशारा त्यांनी दिला आहे.

Web Title: Kapil Mishra slams Kejrival