विषबाधा प्रकरणातील दोषींवर कारवाई करा : सिद्धरामय्या

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 मार्च 2017

"तुरमूल येथील एका खाजगी निवासी शाळेत विषबाधेमुळे तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे ऐकून दु:ख झाले. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाला वेगाने तपास करण्याचे, मृत्यूचे कारण शोधण्याचे आणि दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.'

बंगळूर (कर्नाटक) : कर्नाटकमधील तुमकूर येथील एका शाळेत विषबाधेमुळे तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेची गंभीर दखल घेत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून यामध्ये दोषी असणाऱ्यांना कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार किरण कुमार यांच्या चिक्कनायकाना हल्ली येथील विद्यावर्धिनी इंटरनॅशनल बोर्डिंग स्कूलमध्ये झालेल्या विषबाधेमुळे तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. शाळेच्या वसतीगृहात बुधवारी रात्रीचे जेवण झाल्यानंतर विषबाधा झाली. विषबाधेचे नेमके कारण समजू शकलेले नाही. या प्रकरणाची सिद्धरामय्या यांनी गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "तुरमूल येथील एका खाजगी निवासी शाळेत विषबाधेमुळे तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे ऐकून दु:ख झाले. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाला वेगाने तपास करण्याचे, मृत्यूचे कारण शोधण्याचे आणि दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.' दरम्यान या प्रकरणी किरण कुमार यांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: Karnataka CM orders probe into death due to food poisoning