कर्नाटकात मोदी लाट; भाजप सर्वांत मोठा पक्ष (सकाळी 10)

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 मे 2018

कर्नाटकमध्ये २२४ पैकी २२२ मतदार संघांसाठीची आज (ता. १५) सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस सुरवात झाली. सुरवातीच्या मनमोजणीनुसार काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पहायला मिळली.

बंगळूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराचा धुरळा उडवून प्रतिष्ठेची बनविलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारल्याचे चित्र आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निकालातून कर्नाटकमध्ये मोदी लाट असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना हा मोठ्ठा धक्का मानला जात आहे. सुरवातीच्या मतमोजणीनुसार जनता दल (सेक्युलर) (जेडीएस) हा पक्ष किंग मेकरच्या भूमिकेत असला तरी भाजप मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. त्यामुळे जेडीएसच्या मदतीने सरकार स्थापन करावे लागणार आहे. 

कर्नाटकमध्ये २२४ पैकी २२२ मतदार संघांसाठीची आज (ता. १५) सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस सुरवात झाली. सुरवातीच्या मनमोजणीनुसार काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पहायला मिळली. मात्र, नंतर भाजपने जोरदार मुसंडी मारत काँग्रेसला मागे टाकले. जेडीएसची भूमिका महत्त्वाची असणार आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार भाजप 107, काँग्रेस 67, आणि जेडीएस आणि इतर 47 जागांवर आघाडीवर आहेत.

कर्नाटकमध्ये 12 मे रोजी 70 टक्के मतदान झाल्यानंतर काँग्रेस, भाजप आणि धर्मनिरपेक्ष जनता दल यांच्यात चुरशीची लढतआहे. बहुमतासाठी 112 जागा मिळणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी सत्तेवर पुन्हा दावा केला असून भाजपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार येडियुरप्पा यांनीही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला. तर धर्मनिरपेक्ष जनता दल हा पक्ष राज्यात सत्तास्थापनेत ‘किंगमेकर’ची भूमिका बजावेल, असे संकेत मतपूर्व चाचण्यांत देण्यात आले होते. 

किनारपट्टीच्या भागात भाजपने पूर्णपणे वर्चस्व मिळविल्याचे पहायला मिळत आहे. तर, कर्नाटकमध्ये महत्त्वाच्या असलेल्या लिंगायत समाजाची मते भाजपलाच गेली असल्याचे पहायला मिळत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे एका ठिकाणाहून आघाडीवर आणि एका ठिकाणी पिछाडीवर असल्याचे पहायला मिळत आहे. 

Web Title: #Karnatakaverdict BJP leads in Karnataka assembly election Congress trails