गोभक्तीच्या नावाखाली लोकांचे जीव घेऊ नका: भावूक पंतप्रधान

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 जून 2017

गोभक्तीच्या नावाखाली लोकांचे जीव घेणे सर्वथा अमान्य आहे. अशा प्रकारच्या हिंसाचारास महात्मा गांधींच्या मूल्यांतर्गत मान्यता दिली जाऊही शकत नाही. या समाजात हिंसेला स्थान नसावे. भारत ही अहिंसेची भूमी आहे

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) अंतिमत: आपले मौन सोडत गोसंरक्षणाच्या नावाखाली देशभरात घडत असलेल्या हिंसक घटना सर्वथा अमान्य असल्याची भावना व्यक्त केली. "देशामधील कोणत्याही नागरिकास कायदा हातात घेण्याची परवानगी नसल्याचे,' स्पष्ट करत भावूक झालेल्या पंतप्रधानांनी यावेळी "लोकांचे जीव घेणे म्हणजे गोरक्षा नव्हे,' असेही सुनावले. मोदी हे साबरमती आश्रमामधील एका कार्यक्रमामध्ये बोलत होते.

"गायींचे संरक्षण करावयास हवेच. गोसंरक्षणासंदर्भात महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांच्याइतकी सुस्पष्ट भूमिका कोणीही मांडलेली नाही. मात्र गोभक्तीच्या नावाखाली लोकांचे जीव घेणे सर्वथा अमान्य आहे. अशा प्रकारच्या हिंसाचारास महात्मा गांधींच्या मूल्यांतर्गत मान्यता दिली जाऊही शकत नाही. या समाजात हिंसेला स्थान नसावे. भारत ही अहिंसेची भूमी आहे. आपण सगळे एकत्र काम करु. महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी प्रयत्न करु. भारताच्या स्वातंत्र्यासाठी झगडलेल्या स्वातंत्र्यवीरांना अभिमान वाटेल, असा भारत निर्माण करु,'' अशी भावना मोदी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. साबरमती आश्रमासहित चंपारण्यच्या ऐतिहासिक सत्याग्रहाच्या आंदोलनाची या वर्षी शतकपूर्ती होत आहे. या पार्श्‍वभूमीवर बोलताना पंतप्रधानांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

गोसंरक्षणाच्या नावाखाली हिंसाचाराच्या घटना देशभरात घडल्या आहेत. या घटनांचा समाजामधील विविध स्तरांमधून कडक निषेधही नोंदविण्यात आला होता. मात्र पंतप्रधानांनी यासंदर्भात मौन बाळगल्याची टीका करण्यात येत होती. या पार्श्‍वभूमीवर मोदी यांनी मांडलेली ही भूमिका अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे.