अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नकाच भारताचा चीनला इशारा

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 एप्रिल 2017

नवी दिल्ली : तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेश भेटीला आक्षेप घेणाऱ्या चीन सरकारला आज भारताने खडे बोल सुनावले आहेत. चीनने आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये, आम्ही 'एक चीन' धोरणाचा आदर करतो, चीनकडूनही आम्हाला याचीच अपेक्षा असल्याचे भारत सरकारने म्हटले आहे. 

नवी दिल्ली : तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेश भेटीला आक्षेप घेणाऱ्या चीन सरकारला आज भारताने खडे बोल सुनावले आहेत. चीनने आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये, आम्ही 'एक चीन' धोरणाचा आदर करतो, चीनकडूनही आम्हाला याचीच अपेक्षा असल्याचे भारत सरकारने म्हटले आहे. 

दलाई लामा यांच्या अरुणाचल भेटीवर निवेदन करताना केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू म्हणाले की, ''लामांची अरुणाचल भेट ही पूर्णपणे धार्मिक असून, याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहता कामा नये. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य घटक असून, चीनने लामांच्या भेटीला आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही. भारताने कधीच चीनच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप केलेला नाही. भारत आणि चीनमध्ये सीमेवरून काही वाद आहेत; पण अरुणाचल प्रदेशावर चीनचा कसलाही अधिकार नाही.''

चीनने अरुणाचल प्रदेशचा वाद निष्कारण उकरून काढू नये. कारण, या प्रदेशावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, लामांनी अरुणाचल प्रदेशला भेट दिल्यास द्विपक्षीय संबंधांचे नुकसान होईल, असा इशारा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला होता. लामांनी अरुणाचल प्रदेशला भेट देण्याची ही दुसरी वेळ असून, याआधी 2009 मध्ये ते अरुणाचल प्रदेशमध्ये आले होते. 

रिजिजू म्हणाले... 

  • लोकांच्या आमंत्रणावरून लामा अरुणाचलमध्ये 
  • सरकार धार्मिक कार्यक्रमांत हस्तक्षेप करत नाही 
  • दलाई लामा राजकीय भाष्य करणार नाहीत 
  • अरुणाचललाही चीनसोबत चांगले संबंध हवेत 
  • मॅकमोहन सीमेवरील व्यापार केंद्र पुन्हा सुरू व्हावे 
  • अरुणाचलकडून लामांना विशेष अतिथीचा दर्जा 

प्रतिकूल हवामानाचा अडथळा 
दलाई लामा आज अरुणाचलमधील बोमदिला येथे पोचले, प्रतिकूल हवामानामुळे त्यांना तवांगमधील बौद्ध मठाला भेट देणे शक्‍य झाले नाही. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे लामांच्या हेलिकॉप्टरला उड्डाण करणे शक्‍य नव्हते. सध्या ते गाडीतून प्रवास करत असून, ते उद्या (ता.5 रोजी) ते तवांगला पोचणे अपेक्षित आहे, असे भाजप नेते तापीर गावो यांनी सांगितले. अन्य काही भाजप नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार लामा सध्या बोमदिलामध्ये असून, ते आता तेथेच विश्रांती घेणार आहेत.

Web Title: Kiran Rijiju says China should not interfere in India