अभिनेता दिलीप याची कारागृहात रवानगी

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 जुलै 2017

गुन्ह्यात कोणाचाही सहभाग असो, कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई ही होणारच. याप्रकरणी योग्य चौकशी करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांना देण्यात आले आहेत.
- पिनाराई विजयन, मुख्यमंत्री, केरळ

अभिनेत्रीचे अपहरण व अत्याचारप्रकरणी कारवाई

कोची: दाक्षिणात्य अभिनेत्रीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी मल्याळी अभिनेता दिलीप याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, मल्याळी कलाकारांच्या संघटनेतून दिलीप याची हकालपट्टी करण्यात आली आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्रीचे फेब्रुवारीमध्ये अपहरण करून तिच्यावर हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी कट केल्याच्या आरोपावरून दिलीप याला काल (सोमवारी) अटक करण्यात आली आहे. दिलीप याने मल्याळीसोबत तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. या प्रकरणातील मुख्य संशयिताने पोलिसांसमोर दिलीप याचे नाव उघड केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने आज त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. दिलीप याला अलुवा कारागृहात ठेवण्यात आले असून, ते त्याचे मूळ गावही आहे. अलुवा कारागृहाबाहेर शेकडो निदर्शकांनी दिलीप याच्याविरोधात आज घोषणाबाजी केली.

दिलीप याच्या वकिलांनी न्यायालयात जामीन अर्ज केला असून, उद्या यावर सुनावणी होण्याची शक्‍यता आहे. दिलीप याला कारागृहात कोणत्याही विशेष सुविधा देण्याचा आदेश न्यायालयाने दिलेला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. "असोसिएशन ऑफ मल्याळम मूव्ही आर्टिस्ट्‌स' (एएमएमए) या संघटनेने तातडीने कार्यकारिणीची सभा घेतली. या सभेत दिलीप याचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते मामुट्टी यांनी पीडित अभिनेत्रीला पाठिंबा दर्शविला आहे.