rajendra-tukpare
rajendra-tukpare

कोल्हापूरचा जवान गोळीबारात हुतात्मा 

जम्मू - दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी मदत व्हावी, यासाठी पाकिस्तानच्या सैन्याने शस्त्रसंधीचा भंग करीत पूँच जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी केलेल्या जोरदार गोळीबारात भारतीय लष्कराचे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्‍यातील कार्वे गावचे सुपुत्र राजेंद्र तुपारे यांच्यासह दोन जवान हुतात्मा झाले, तर दोन जवान, दोन स्थानिक महिला आणि सीमा सुरक्षा दलाचा एक अधिकारी असे पाच जण जखमी झाले. भारतीय जवानांनी कृष्णा घाटी आणि पूँच सेक्‍टरमध्ये झालेले घुसखोरीचे दोन्ही प्रयत्न उधळून लावत पाकिस्तानच्या अनेक चौक्‍या उद्‌ध्वस्त केल्या. 

भारतीय लष्करातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा घाटी सेक्‍टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावताना एक जवान हुतात्मा झाला, तर पूँच सेक्‍टरमध्येही घुसखोरांना हुसकावून लावताना एक जवान हुतात्मा झाला, तर दोन जवान आणि एक महिला जखमी झाले. या दोन्ही ठिकाणी घुसखोरांना साह्य व्हावे, यासाठी पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचा भंग करत गोळीबार केला. कृष्णा घाटी येथील चकमकीत हुतात्मा झालेल्या जवानाची ओळख पटली असून, शीख रेजिमेंटचे जवान गुरुसेवक सिंग (वय 23) असे त्यांचे नाव आहे. 

पूँच येथे हुतात्मा झालेल्या जवानाची ओळख पटली असून, नायक राजेंद्र नारायण तुकपारे असे त्यांचे नाव आहे. ते महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. जखमी झालेल्या महिलेचे नाव सलीमा अख्तर असे असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सीमा सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक नितीन कुमारही गोळीबारात जखमी झाले असून, त्यांच्या लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती बीएसएफच्या एका अधिकाऱ्याने दिली. पाकिस्तानी सैन्याने नागरी वस्त्यांनाही लक्ष्य करत उखळी तोफांनी मारा केला. ही चकमक अद्यापही सुरू आहे. 

तुपारेंच्या गावावर शोककळा 

चंदगड- मजरे कार्वे (ता. चंदगड) येथील जवान राजेंद्र नारायण तुपारे हुतात्मा झाल्याची माहिती त्यांच्या सहकाऱ्याने दुपारी त्यांच्या नातेवाइकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून दिली. ही बातमी समजताच गावावर दुःखाचे सावट पसरले. दुपारपासून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. त्यांचे पार्थिव गावाकडे कधी आणणार, याबाबत कुटुंबीय आणि ग्रामस्थ रात्री उशिरापर्यंत लष्कराच्या मुख्यालयाशी संपर्क साधून माहिती घेत होते. 

2002 ला बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर राजेंद्र बेळगाव येथे मराठा लाइट इंफन्ट्रीत भरती झाले. दहा वर्षापूर्वी गावातील पोलिसपाटील जोतिबा गडकरी यांच्या द्वितीय कन्या शर्मिला यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पत्नी आणि मुले आर्यन (वय 7) व वैभव (5) या मुलांसह काही काळ त्यांच्या बरोबरच होते; परंतु सीमेवर कार्यरत झाल्यानंतर मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून पत्नी बेळगाव येथे विजयनगर भागात राहू लागल्या. त्यांचे एकत्र कुटुंब असून, वडील शेतकरी, तर आई गृहिणी आहे. एक भाऊ शेती करतात, तर दुसरा भाऊ शिक्षक म्हणून नोकरी करतो. सहा महिन्यांपूर्वी राजेंद्र गावाकडे आले होते. हरहुन्नरी स्वभावाचा तरुण म्हणून त्यांची गावात ओळख होती. सुटीला आल्यानंतर आपल्या परिचयातील प्रत्येक व्यक्तींना ते आवर्जून भेटत असत. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला. गावच्या सुपुत्राला वीर मरण आल्याचा अभिमान आणि दुःख, असे वातावरण होते. 

सैन्यात नोकरी करणाऱ्या राजेंद्र यांना शेतीची आवड होती. निवृत्तीनंतर शेतीच करण्याचा त्यांचा मानस होता. दरम्यान, त्यांचा तो सुटीचा काळ शेवटचा ठरला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com