कुलभूषण जाधव यांच्या मित्रांनी केला जल्लोष

पीटीआय
शुक्रवार, 19 मे 2017

निकाल जाहीर होताच या इमारतीबाहेर अनेक नागरिक जमा झाले आणि त्यांनी देशभक्तीपर घोषणा देत फटाके फोडले आणि मिठाई वाटली. या जल्लोषात राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. जाधव यांच्या मित्रांनी पाकिस्तानवर दबाव आणण्याच्या दृष्टीने सह्यांची मोहीमही राबविली होती

मुंबई - आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिल्यानंतर येथील त्यांच्या मित्रांनी फटाके फोडत जल्लोष केला. जाधव कुटुंबीय पूर्वी राहत असलेल्या इमारतीबाहेर नागरिकांनी "वंदे मातरम' आणि "भारत माता की जय' अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

लोअर परळ भागात जाधव कुटुंबीय आधी राहत होते. येथील त्यांचा बालमित्र तुलसीदास पवार आणि इतर मित्र, शेजारी दुपारपासून टीव्ही लावून निकाल सुनावला जाण्याची वाट पाहत होते. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल ऐकताच त्यांनी एकच जल्लोष केला. सव्वाशे कोटी भारतीयांच्या प्रार्थनेला फळ मिळाल्याची भावना आनंदित झालेल्या पवार यांनी या वेळी व्यक्त केली. कुलभूषण यांनी लवकर आणि सुखरूप भारतात परतावे, यासाठी आम्ही सर्वजण प्रार्थना करत असल्याचे आणि यासाठी गणेशपूजा करणार असल्याचेही पवार म्हणाले. निकाल जाहीर होताच या इमारतीबाहेर अनेक नागरिक जमा झाले आणि त्यांनी देशभक्तीपर घोषणा देत फटाके फोडले आणि मिठाई वाटली. या जल्लोषात राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. जाधव यांच्या मित्रांनी पाकिस्तानवर दबाव आणण्याच्या दृष्टीने सह्यांची मोहीमही राबविली होती.

कुलभूषण जाधव यांची जमीन असलेल्या सातारा जिल्ह्यातील आणेवाडी येथेही निकालानंतर आनंदाचे वातावरण होते. ही चांगली सुरवात असून, भारत सरकारने आता अधिक प्रयत्न करत कुलभूषण यांना परत आणावे, अशी इच्छा येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली.