लालूप्रसाद यादव यांच्या निवासस्थानासह अन्य ठिकाणी सीबीआयचे छापे

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 जुलै 2017

रेल्वेमंत्री असताना 2008 साली लालूप्रसाद यांनी एका खाजगी कंपनीला रेल्वे स्थानकावरील हॉटेल्सची देखरेख करण्याचे कंत्राट बेकायदेशीररित्या दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्याबदल्यात कंत्राटदाराकडून पाटना येथे मोठा मॉल उभा करण्यासाठी दोन एकर जागा घेतल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे.

नवी दिल्ली - राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव आणि त्यांचे सुपुत्र, बिहारचे मंत्री तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध सीबीआयने आज (शुक्रवार) भ्रष्टाचाराची तक्रार दाखल केली. त्यानंतर आज पहाटेपासूनच त्यांच्या पाटना येथील निवासस्थानासह अन्य ठिकाणी सीबीआयने छापे टाकून तपासणी सुरू केली आहे.

रेल्वेमंत्री असताना 2008 साली लालूप्रसाद यांनी एका खाजगी कंपनीला रेल्वे स्थानकावरील हॉटेल्सची देखरेख करण्याचे कंत्राट बेकायदेशीररित्या दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्याबदल्यात कंत्राटदाराकडून पाटना येथे मोठा मॉल उभा करण्यासाठी दोन एकर जागा घेतल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी सीबीआयने आज लालूप्रसाद यांच्या घरावर छापा टाकून चौकशी सुरु केली आहे. याशिवाय रेल्वेचे (IRCTC) माजी व्यवस्थापकीय संचालकांच्या निवासस्थानीही सीबीआयची चौकशी सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली, पाटना, पुरी, रांचीसह अन्य 12 ठिकाणी सीबीआयचा तपास सुरू आहे.

लालूप्रसाद यादव यांच्या मॉलच्या संबंधी यापूर्वीच वाद सुरू आहेत. हे प्रकरण न्यायालयात असून गुरुवारीच बिहार सरकारने पर्यावरणाचा ना हरकत प्रमाणपत्र न घेता या मॉलच्या बांधकाम सुरू झाल्याचे मान्य केले. पाटना ÷उच्च न्यायालयात या प्रकरणी चौकशी सुरू आहे.