सर्वांचे कायदेशीर धन पूर्णत: सुरक्षित: मोदी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

प्रत्येक नागरिकास त्याचे धन खर्च करण्याचा पूर्ण अधिकार आहे. कोणीही कोणाचेही धन हिरावून घेऊ शकत नाही. आता नागरिक मोबाईल तंत्रज्ञानाच्या माध्यमामधूनही धन खर्च करु शकतात. जग हे बदलत आहे. तेव्हा आपणही "कॅशलेस' अर्थव्यवस्थेकडे मार्गक्रमण करावयास हवे...

नवी दिल्ली - काळे धन आणि भ्रष्टाचाराविरोधातील लढाईमध्ये आता सामान्य नागरिक हा सैनिक झाल्याचे मत व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) देशातील जनतेने कायदेशीर मार्गाने जोडलेले पूर्णत: सुरक्षित असल्याचे प्रतिपादन केले.

"प्रत्येक नागरिकास त्याचे धन खर्च करण्याचा पूर्ण अधिकार आहे. कोणीही कोणाचेही धन हिरावून घेऊ शकत नाही. आता नागरिक मोबाईल तंत्रज्ञानाच्या माध्यमामधूनही धन खर्च करु शकतात. जग हे बदलत आहे. तेव्हा आपणही "कॅशलेस' अर्थव्यवस्थेकडे मार्गक्रमण करावयास हवे,'' असे पंतप्रधान म्हणाले. सरकारच्या 500 व 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचे पंतप्रधानांनी यावेळी जोरदार समर्थन केले. सरकारच्या या निर्णयाची माहिती काही जणांना आधीच देण्यात आली नसल्याने ते सरकारवर संतप्त झाले असल्याची टीका पंतप्रधानांनी यावेळी केली.

"या निर्णयासंदर्भात सरकारवर टीका करणाऱ्यांना सरकारच्या तयारीविषयी काहीही आक्षेप नाही. त्यांना त्याचे काळे धन श्‍वेत करता आले नाही, ही त्यांची खरी समस्या आहे,'' असे मोदी म्हणाले. आज राज्यघटना दिनानिमित्त संसदेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान बोलत होते.

500 व 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्यासंदर्भातील सरकारच्या निर्णयावरुन सध्या देशामध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटली आहे. विविध राजकीय पक्षांनी या निर्णयावरुन सरकारला लक्ष्य केले आहे. या पार्श्‍वभूमीवर, पंतप्रधानांनी व्यक्‍त केलेली ही भूमिका अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे.