उद्धव महिनाभर झोपले होते काय? : पासवान

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 5 मे 2017

लष्कराला सर्वाधिकार द्या
पाकिस्तानच्या कागाळ्या प्रमाणाबाहेर वाढल्याने भारताने पाकशी लढण्यासाठी आता जशास तसे व ठोशास ठोसा, हे धोरण स्वीकारावे, असे मत पासवान यांनी व्यक्त केले. काश्‍मिरी हे आपलेच भाऊ व आपल्याइतकेच देशप्रेमी आहेत. मात्र तेथील गेल्या काही महिन्यांतील घडामोडींनी आपले मत बदलले आहे. काश्‍मिरात पाकपुरस्कृत हिंसाचाराने पायरी ओलांडली आहे. आपले शूर जवान मारले जात आहेत. त्यामुळे या खोऱ्यात लष्कराला सर्वाधिकार द्यायला पाहिजेत.

नवी दिल्ली - दिल्लीत गेल्या महिन्यात झालेल्या भाजप आघाडीच्या (एनडीए) बैठकीत "पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालीच 2019 मधील निवडणुकाही लढविणार,' हा जो ठराव एकमताने मंजूर झाला त्यावर सही करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आपण अजिबात दबाव आणला नाही, असे लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी आज स्पष्टपणे सांगितले. त्याची तक्रार करण्यासाठी ठाकरे यांनी इतके दिवस का लावले, गेला महिनाभर ते काय झोपले होते का, असाही हल्ला त्यांनी चढविला.

प्रेस क्‍लब ऑफ इंडियाच्या वतीने झालेल्या "मीट द प्रेस' कार्यक्रमात पासवान बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष गौतम लाहिरी, विनय ठाकूर व अरुण जोशी आदी पदाधिकारी हजर होते. पासवान यांनी नोटाबंदी ही कमालीची यशस्वी ठरल्याचे सांगताना अनवधानाने "नसबंदी' असा शब्दप्रयोग वापरल्यावर हास्यकल्लोळ उसळला.

ते म्हणाले, की "एनडीए'च्या बैठकीत ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर बोलले. त्यांनी मोदी यांच्या नेतृत्वावर विश्‍वास दाखविला व तो बैठकीत जाहीरपणे बोलून दाखविला. "एनडीए'तील सर्व 33 राजकीय पक्षांनी मोदींचे नेतृत्व एकमुखाने मान्य करून त्या ठरावावर सह्या केल्या. ठाकरे यांच्याकडून जबरदस्तीने सही घेतलेली नाही.

"एनडीए'मध्ये मोदींच्या नेतृत्वाबाबत दुमत नाही. ठाकरे हे कधीही, काहीही बोलतात व "सामना'तूनही लिहीत असतात. मात्र मोदी यांना देशाच्या जनतेचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट आहे. या ठरावानंतरच्या पत्रकार परिषदेला, तर अर्थमंत्री अरुण जेटली व तेलुगू देसमचे चंद्राबाबू नायडू हेही हजर होते. त्या बैठकीलाही महिना उलटल्यावर ठाकरे यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. महिनाभर ते झोपले होते का?

आगामी "जीएसटी' विधेयकामुळे देशात एकसमान करप्रणालीचे ऐतिहासिक पर्व सुरू होईल व याचे फायदे अनेक असतील असे सांगताना पासवान म्हणाले, की यामुळे नाशिकचा कांदा दिल्लीत स्वस्तात मिळेल व भाजीपाल्यासारख्या नाशवंत मालाची वाहतूकही 24 तासांत व स्वस्त उपलब्ध होईल. हॉटेलांना सेवा कर घेण्यास कोणी बंदी केलेली नाही; मात्र त्याच्याआडून ग्राहकांची पिळवणूक होत असेल, तर सरकार ते स्वस्थपणे पाहणार नाही, असे सांगून ते म्हणाले, की ग्राहक संरक्षण कायद्यात राज्यसभेच्या संसदीय समितीने अनेक दुरुस्त्या सुचविल्या होत्या. त्या करून हे विधेयक कायदा मंत्रालयाकडे पाठविले गेले आहे.

लष्कराला सर्वाधिकार द्या
पाकिस्तानच्या कागाळ्या प्रमाणाबाहेर वाढल्याने भारताने पाकशी लढण्यासाठी आता जशास तसे व ठोशास ठोसा, हे धोरण स्वीकारावे, असे मत पासवान यांनी व्यक्त केले. काश्‍मिरी हे आपलेच भाऊ व आपल्याइतकेच देशप्रेमी आहेत. मात्र तेथील गेल्या काही महिन्यांतील घडामोडींनी आपले मत बदलले आहे. काश्‍मिरात पाकपुरस्कृत हिंसाचाराने पायरी ओलांडली आहे. आपले शूर जवान मारले जात आहेत. त्यामुळे या खोऱ्यात लष्कराला सर्वाधिकार द्यायला पाहिजेत.