म्हशीची कत्तल केल्याच्या संशयावरून मारहाण

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 मे 2017

अलिगड (उत्तर प्रदेश) : म्हशीची कत्तल केल्याच्या संशयावरून जमावाने एका व्यक्तीच्या घरात घुसून त्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे एका लहान मुलाला कपिल बाघेल यांच्या घरातून रक्त बाहेर वाहत असल्याचे दिसले. त्यानंतर त्याने ही बाब काही लोकांना सांगितली. त्यानंतर अफवा पसरली. त्यामुळे मोठा जमाव त्या घराबाहेर जमला. दरम्यान काहींनी पोलिसांना कळविले. 'म्हशीची कत्तल केल्याचे म्हणत त्यांनी एका व्यक्तीला खाटीक असे म्हटले', अशी माहिती एका संतप्त स्थानिकाने दिली. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला असून त्यामध्ये काही जणांनी कपिल यांच्या घरात घुसून मारहाण करत त्यांना बाहेर काढल्याचे दिसत आहे.

'कपिल बाघेलच्या घरात एका म्हशीची कत्तल होत असल्याचे आम्हाला समजले. आम्ही तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तेथे असलेल्यांना ताब्यात घेतले. एकूण पाच जणांना ताब्यात घेतले आहे', अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणाचा तपास सुरू असून त्यातील दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन पोलिसांनी दिले आहे.