भारतात 2030पर्यंत इलेक्‍ट्रिक वाहनांचे लक्ष्य 

वृत्तसंस्था
रविवार, 30 एप्रिल 2017

इलेक्‍ट्रिक वाहनांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढविण्याचा निश्‍चय केंद्र सरकारने केला आहे. ही वाहने स्वयंपूर्ण असतील. 2030 नंतर एकही पेट्रोल अथवा डिझेलवर चालणारे वाहन देशात विकले जाऊ नये, यासाठी हा प्रयत्न आहे.

नवी दिल्ली - "भारतामध्ये 2030 पर्यंत सर्व इलेक्‍ट्रिक वाहनेच रस्त्यांवर उतरतील, असे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. इंधन आयातीमध्ये होणारा खर्च वाचविण्यासाठी आणि नागरिकांचा प्रवासाचाही खर्च वाचविण्यासाठी हा प्रयत्न आहे,'' असे केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी आज सांगितले. 

येथील एका कार्यक्रमात बोलताना गोयल म्हणाले, "इलेक्‍ट्रिक वाहनांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढविण्याचा निश्‍चय केंद्र सरकारने केला आहे. ही वाहने स्वयंपूर्ण असतील. 2030 नंतर एकही पेट्रोल अथवा डिझेलवर चालणारे वाहन देशात विकले जाऊ नये, यासाठी हा प्रयत्न आहे. यासाठी इलेक्‍ट्रिक वाहनांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना भारतात स्थिरस्थावर होण्यासाठी मदत करण्याचीही केंद्राची तयारी आहे.''

मारुती वाहन उद्योगालाही सुरवातीच्या काळात सरकारकडून मदत मिळाली होती आणि नंतर हा उद्योग भरभराटीला आला, असे उदाहरणही गोयल यांनी सांगितले. इलेक्‍ट्रिक वाहनांची प्रसिद्धी आणि प्रसार करण्यासाठी अवजड उद्योग मंत्रालय आणि निती आयोग याबाबतचे धोरण आखत आहेत, असेही ते म्हणाले. इलेक्‍ट्रिक वाहनांमुळे खर्चात बचत होत असल्याचे नागरिकांना पटल्यास अशा वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ होईल, असा दावाही त्यांनी केला.