शौचालय नाही तर विवाह नाही

शरद प्रधान
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

उत्तर प्रदेशातील गावाचा अभिनव निर्णय

लखनौ: घरांमध्ये शौचालय बांधण्याच्या जिद्दीमुळे उत्तर प्रदेशमध्ये विविध कल्पनांचा जन्म होताना दिसत आहे. राज्यातील एका गावातील नागरिकांनी, शौचालय नसलेल्या घरामधील मुलाबरोबर आपल्या गावातील मुलीचा विवाह करून द्यायचा नाही, असा निर्णय घेतला आहे.

उत्तर प्रदेशातील गावाचा अभिनव निर्णय

लखनौ: घरांमध्ये शौचालय बांधण्याच्या जिद्दीमुळे उत्तर प्रदेशमध्ये विविध कल्पनांचा जन्म होताना दिसत आहे. राज्यातील एका गावातील नागरिकांनी, शौचालय नसलेल्या घरामधील मुलाबरोबर आपल्या गावातील मुलीचा विवाह करून द्यायचा नाही, असा निर्णय घेतला आहे.

उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यामधील ब्राह्मणपुथी गावातील पंचायतीने गेल्या आठवड्यात एक निर्णय एकमुखाने घेतला. आपल्या घरामध्ये शौचालय बांधण्याइतपतही काळजी घेऊ न शकणाऱ्या कुटुंबाशी विवाह संबंध जोडणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. पंचायतीच्या या निर्णयामुळे प्रशासनालाही सुखद धक्का बसला असून, या गावाला सर्वप्रकारे मदत करण्याचे आश्‍वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहे. राज्याला उघड्यावरील शौचापासून मुक्त करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा भाग म्हणून स्थानिक प्रशासनही नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहित करत असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले. केवळ 1300 लोकसंख्या असलेल्या या गावातील विविध राजकीय पक्षांचे नेतेही मतभेद विसरून पंचायतीच्या या निर्णयाच्या बाजूने उभे राहिले आहेत. विवाहाची बोलणी सुरू झाल्यावर पंचायतीचे सदस्य संभाव्य वराच्या घरी जाऊन तपासणी करणार असून, घरामध्ये शौचालय नसल्यास त्यांना विवाहासाठी नकार कळविला जाणार आहे. या आपल्या निर्णयाचा ते इतर गावांमध्ये जाऊनही तोंडी प्रचार करणार आहेत.

राखीपौर्णिमेला शौचालय
वाराणसी जिल्ह्यातील फुलपूर या गावातील अनेक भावांनी राखीपौर्णिमेनिमित्त आपल्या बहिणींना शौचालय बांधून दिले आहे. या भावांचे कौतुक करत प्रशासनाने त्यांना प्रोत्साहन म्हणून भेटवस्तूही दिल्या. तसेच, काही गावांमधील दिव्यांग मुलींना राखीपौर्णिमेची भेट म्हणून प्रशासनानेही शौचालय बांधून दिले.