ज्यांना जायचेय त्यांनी खुशाल जावे: अखिलेश यादव

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

लखनौ: "ज्यांना पक्ष सोडायचा आहे, त्यांनी तो खुशाल सोडावा, यानिमित्ताने वाईट काळात आपल्यासोबत कोण टिकले, याची ओळख आपल्याला होईल', असे प्रतिपादन समाजवादी पक्षाचे (सप) प्रमुख अखिलेश यादव यांनी आज केले.

लखनौ: "ज्यांना पक्ष सोडायचा आहे, त्यांनी तो खुशाल सोडावा, यानिमित्ताने वाईट काळात आपल्यासोबत कोण टिकले, याची ओळख आपल्याला होईल', असे प्रतिपादन समाजवादी पक्षाचे (सप) प्रमुख अखिलेश यादव यांनी आज केले.

सपतील बुक्कल नवाब, सरोजिनी अगरवाल, यशवंत सिंह यांनी नुकतीच पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर अखिलेश यांनी संबंधित नेत्यांवर टीका केली. पक्षाच्या मुख्यालयात नेते व कार्यकर्ते यांना संबोधित करताना अखिलेश म्हणाले, ""पक्षातील वातावरण खराब झाले असून, तेथे आपली घुसमट होत असल्याची कारणे काही नेत्यांनी दिली आहेत. मात्र, हे पक्ष सोडण्याचे कारण होऊ शकत नाही. त्यांनी दुसरे कोणतेही कारण शोधायला हवे होते.''

पक्षाचे कामकाज सुरळीतपणे सुरु असून, अलिकडेच असंख्य महिला, शेतकरी आणि तरुणांनी सपला पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे ज्यांना पक्षा सोडायचा आहे, त्यांनी तो जरुर सोडावा. असेही अखिलेश यांनी स्पष्ट केले.

तेच नवाब आता सज्जन झाले
ईदवेळी आपण बुक्कल नवाब यांच्या घरी गेलो होते. तेव्हाच त्यांनी पक्षा सोडण्याचे संकेत दिले होते. भाजपने त्यांच्या भू माफिया असल्याचा आरोप केला होता. भाजपशी संबंध नसताना ते वाईट होते. आणि आता पक्षात प्रवेश केला तर, ते एक सज्जन व प्रामाणिक व्यक्ती झाले, अशी टिप्पणी अखिलेश यादव यांनी केली. अगरवाल यांचे पक्ष सोडण्याचे कारण स्पष्ट नसले, तरी, जमिनीच्या वादातूनच त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. असेही अखिलेश यांनी नमूद केले.