योगींचे नेतृत्व "यूपी' स्वीकारणार का?

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होणार शिक्कामोर्तब

 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होणार शिक्कामोर्तब

 

लखनौ: उत्तर प्रदेशातील भाजपचा हिंदुत्ववादी चेहरा असलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सत्ताग्रहण केल्यानंतर राज्यात प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असून, ही आदित्यनाथ यांची एक प्रकारे परीक्षा मानली जात आहे. उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अधिसूचना ऑक्‍टोबरच्या अखेरीस निघण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष त्यादृष्टीने तयारीला लागले आहेत. मात्र, आदित्यनाथ यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. या निवडणुकीतील यशावरून आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशातील जनतेने मुख्यमंत्री म्हणून स्वीकारले आहे की नाही, याची पडताळणी होणार असल्याचे मत राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

उत्तर प्रदेशातील गोरखपूर मठाचे प्रमुख असलेले आदित्यनाथ यांच्या भाजपने चालू वर्षाच्या सुरवातीला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हिंदुत्ववादी लाटेचा फायदा घेत बहुमत प्राप्त केले होते. त्यानंतर आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागली होती. मुख्यमंत्री म्हणून आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कस लागणार आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
या निवडणुका स्थानिक मुद्‌द्‌यावर लढल्या जात असल्या तरी, आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या विरोधात मतदान करण्याची संधी मतदारांना मिळणार आहे. त्यामुळे आदित्यनाथ यांच्यासाठी ही मुख्यमंत्री म्हणून पहिली परीक्षा आहे, अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे आमदार राजपाल कश्‍यप यांनी व्यक्त केले. राज्य सरकारची धोरणे आणि प्रशासकीय कारभारातील त्रुटी दूर करण्याची संधी म्हणूनही सत्ताधारी भाजपने या निवडणुकीच्या निकालांकडे पाहावे, असे मत राजकीय निरीक्षक मंजुळा उपाध्याय यांनी मांडले.

उत्तर प्रदेशातील महापालिकांच्या निवडणुकीत उतरण्यासाठी "आप'ही जोरदार तयारी करताना दिसते आहे. ""ज्या ठिकाणी "आप'ची चांगली ताकद आहे, त्या ठिकाणी आम्ही निवडणूक लढणार आहोत,'' अशी माहिती "आप'चे नेते संजय सिंह यांनी दिली. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका न लढवता "आप'ने आपले सर्व लक्ष्य पंजाबमधील निवडणुकीवर केंद्रित केले होते.