'जम्मू-काश्‍मिरशिवाय देशातील सर्व मदरश्‍यांमध्ये दिले जातात शांततेचे धडे'

वृत्तसंस्था
शनिवार, 1 एप्रिल 2017

देशभरातील सर्व मदरश्‍यांमध्ये शांततेचे धडे दिले जातात, असा दावा मध्य प्रदेश मदरसा बोर्डाचे अध्यक्ष सय्यद इमामुद्दीन यांनी म्हटले आहे. मात्र, जम्मू-काश्‍मिरमध्ये काय चालते, त्याबाबत माहिती नसल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

भोपाळ (मध्य प्रदेश) : देशभरातील सर्व मदरश्‍यांमध्ये शांततेचे धडे दिले जातात, असा दावा मध्य प्रदेश मदरसा बोर्डाचे अध्यक्ष सय्यद इमामुद्दीन यांनी म्हटले आहे. मात्र, जम्मू-काश्‍मिरमध्ये काय चालते, त्याबाबत माहिती नसल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

वृत्तसंस्थेशी बोलताना इमामुद्दीन म्हणाले, "मी संपूर्ण जबाबदारीने सांगतो की जम्मू-काश्‍मिरसोडून देशभरातील सर्व मदरश्‍यांमध्ये शांततेचे धडे दिले जातात. तेथे काय होते याबाबत काहीही माहिती नाही.' मदरश्‍यामध्ये शिकविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमामध्ये एक नवा पाठ समाविष्ट करण्यात येणार असल्याचे यावेळी इमामुद्दीन यांनी सांगितले. ते म्हणाले, "आम्ही "वतन से मोहब्बत का इस्लाम मे क्‍या महत्त्व है' या मुद्यावर आधारित एक नवा पाठ अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे. प्रत्येकाने आपल्या देशावर, मातीवर प्रेम करायला हवे.' आपल्या देशावर प्रेम करणे ही प्रत्येकाची केवळ सामाजिक जबाबदारी नसून ते धार्मिक कर्तव्य असल्याचेही ते पुढे म्हणाले. वर्तमान स्थितीत नैतिक मूल्यांचा समावेश असलेल्या पाठाचा प्रत्येक शैक्षणिक संस्थेने अभ्यासक्रमात समावेश करावा, अशी सूचनाही इमामुद्दीन यांनी दिली.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे आमचे प्रेरणास्थान असल्याचे म्हणत इमामुद्दीन यांनी सांगितले की, "आमचे मुख्यमंत्री आम्हा साऱ्यांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी राज्यात मोठा विकास केला आहे. धर्म आणि जातीच्या पलिकडे जाऊन ते सर्वांसाठी काम करत आहेत.'