मध्य प्रदेशचे आर्थिक वर्ष आता जानेवारी ते डिसेंबर 

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 मे 2017

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर असे करण्याचे सूतोवाच निती आयोगाच्या प्रशासकीय मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत केले होते. याबाबत मोठ्या प्रमाणात सूचना आल्याचे त्यांनी म्हटले होते.

भोपाळ - आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्चऐवजी जानेवारी ते डिसेंबर करण्याची घोषणा करणारे मध्य प्रदेश देशातील पहिले राज्य ठरले आहे. जानेवारी ते डिसेंबर आर्थिक वर्ष करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर असे करण्याचे सूतोवाच निती आयोगाच्या प्रशासकीय मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत केले होते. याबाबत मोठ्या प्रमाणात सूचना आल्याचे त्यांनी म्हटले होते. या पार्श्‍वभूमीवर मध्य प्रदेशने सरकारने आथिर्क वर्ष जानेवारी ते डिसेंबर करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पुढील आर्थिक वर्षासाठीचे अर्थसंकल्पी अधिवेशन डिसेंबर-जानेवारीमध्ये होईल. 

याबाबत पत्रकारांशी बोलताना जनसंपर्कमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले, "राज्य मंत्रिमंडळाच्या मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. हे आर्थिक वर्ष डिसेंबरअखेर संपविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे पुढील अर्थसंकल्प डिसेंबरमध्ये आणि पुढील वर्षी जानेवारीमध्ये होणार आहे.''