तमिळनाडूच्या शाळांत "वंदेमातरम' अनिवार्य

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 जुलै 2017

राज्यातील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रगीत वंदेमातरम हे किमान आठवड्यातून एकदा तरी (प्राधान्याने सोमवार ते शुक्रवार) वाजविणे व गाणे बंधनकारक आहे. तसेच सरकारी कार्यालये व संस्था, खासगी कंपन्या व कारखाने, उद्योग येथे महिन्यातून एकदा "वंदेमातरम' म्हटले गेले पाहिजे

चेन्नई - तमिळनाडूतील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ व अन्य शैक्षणिक संस्थांमध्य "वंदेमातरम' हे राष्ट्रगीत आठवड्यातून एकदा तरी म्हणणे बंधनकारक असल्याचा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने आज (मंगळवार) जाहीर केला.

वीरमणी यांनी यासंदर्भात केलेल्या याचिकेवर हा निर्णय उच्च न्यायालयाने दिला. राज्य भरती मंडळाची परीक्षेत एका गुण कमी पडल्याने त्यांची निवड झाली नव्हती. "वंदे मातरम' हे कोणत्या भाषेत आहे याबद्दलच्या प्रश्‍नावर त्यांनी "बंगाली' असे उत्तर दिले होते. पण उत्तर संचानुसार "वंदे मातरम' हे संस्कृतमधून लिहिले आहे, असे उत्तर अपेक्षित होते. यावर विरोध नोंदवित वीरमणी यांनी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत "वंदे मातरम' संस्कृतमधून की बंगाली भाषेतून लिहिले आहे, याचे स्पष्टीकरण करण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली होती.

त्यावर महाधिवक्ता आर. मुथुकुमारस्वामी यांनी 13 जून रोजी "वंदे मातरम' हे गीत मूळ संस्कृतमधील असून ते बंगाली भाषेत लिहिले असल्याचा निर्णय दिला. त्यानंतर वीरमणी यांना भरती मंडळाने परीक्षेत एक गुण दिला. उच्च न्यायालयाने या निकालात म्हटले आहे की, राज्यातील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रगीत वंदेमातरम हे किमान आठवड्यातून एकदा तरी (प्राधान्याने सोमवार ते शुक्रवार) वाजविणे व गाणे बंधनकारक आहे. तसेच सरकारी कार्यालये व संस्था, खासगी कंपन्या व कारखाने, उद्योग येथे महिन्यातून एकदा "वंदेमातरम' म्हटले गेले पाहिजे.

राष्ट्रगीताचा तमिळ व इंग्रजी अनुवाद करण्याची सूचना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला न्यायालयाने दिली आहे. सरकारी संकेतस्थळे व सोशल मीडियावरही ते उपलब्ध करुन देण्यास सांगितले आहे.