गांधीजींचा आणखी एक मारेकरी होता?

पीटीआय
सोमवार, 29 मे 2017

पंतप्रधानांनाही पत्र
सावरकरांपासून प्रेरणा घेऊन मुंबईमध्ये 2011 मध्ये अभिनव भारत ही संघटना स्थापन झाली आहे. या संस्थेद्वारे समाजातील दुर्बल घटकांसाठी काम केले जाते, असे सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्याबरोबरच फडणीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही पत्र लिहिले आहे. कपूर आयोगाने सावरकरांबद्दल वापरलेले अवमानकारक शब्दही काढून टाकावेत, अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : 'महात्मा गांधी यांचा आणखी एक मारेकरी होता काय? गांधीजींवर तीन गोळ्या झाडल्या गेल्याचे मानले जात असताना, नथुराम गोडसे व्यतिरिक्त आणखी कोणी तरी चौथी गोळी मारली होती काय?' असे प्रश्‍न आज सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे उपस्थित करण्यात आले.

मुंबईतील अभिनव भारत या संस्थेचे विश्‍वस्त आणि अभ्यासक डॉ. पंकज फडणीस यांनी ही याचिका दाखल केली आहे. महात्मा गांधीजींच्या हत्येमागे मोठे कारस्थान असून ते शोधून काढण्यासाठी नवा चौकशी आयोग स्थापन करावा, अशी मागणी फडणीस यांनी याचिकेद्वारे केली आहे. याप्रकरणी 1966 मध्ये स्थापन केलेल्या न्या. जे. एल. कपूर आयोगाला संपूर्ण कारस्थान उघड करता आले नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. गांधी हत्येच्या तपासादरम्यान काही घटनांना जाणीवपूर्वक लपवून ठेवले गेले आहे काय आणि या प्रकरणात विनायक दामोदर सावरकर यांच्यावर आरोप ठेवण्यास काही आधार आहे काय? असे प्रश्‍नही याचिकेद्वारे उपस्थित करण्यात आले आहेत.

गांधी हत्या प्रकरणात नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना 15 नोव्हेंबर 1949 ला फाशी देण्यात आली होती, तर सावरकरांची सबळ पुराव्याअभावी सुटका झाली होती. गांधीजींना तीन गोळ्या मारण्यात आल्या होत्या, या गोष्टीवर विविध न्यायालयांनी विश्‍वास ठेवून आरोपींना दोषी ठरविले होते. फडणीस यांनी 'तीन गोळ्यां'च्या मुद्द्यावर शंका उपस्थित केली आहे.

'आपण केलेले संशोधन आणि त्या काळातील माध्यमांमधील बातम्या यावरून गांधीजींना चार गोळ्या मारण्यात आल्या होत्या, असे दिसून येते. 30 जानेवारी 1948 ला गोडसेने गांधीजींना मारण्यासाठी वापरलेले पिस्तूल सात गोळ्यांचे होते. पोलिसांना या पिस्तुलात नंतर उर्वरित चार गोळ्या मिळाल्या होत्या. या फरकामुळे गांधीजींना मारलेल्या गोळ्यांच्या संख्येबाबत शंका निर्माण होते. गोडसेच्या बंदुकीतून तीनच गोळ्या झाडल्या गेल्या असल्याने चौथी गोळी दुसऱ्या मारेकऱ्याने मारली असली पाहिजे,' असे फडणीस यांनी याचिकेत म्हटले आहे.