इंडिया गेटवर रंगली महेश काळेंची मैफल...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - राजधानीतील ऐतिहासिक इंडिया गेटच्या साक्षीने आज भल्या सकाळी अहीर भैरव रागाचे सूर आसमंतात उमटले आणि त्याच वेळी धुक्‍याचा पडदा हलकेच बाजूला सारून "सूर्यबिंब केशरी' झळाळून वर आले... पं. अभिषेकी बुवांच्या संस्कारांतून उमललेल्या या वेधक सुरांनी त्या सहस्ररश्‍मी सूर्यालाही उत्सुकतेने जणू अंमळ लवकरच वर येण्याची ओढ लावली... हे सूर होते युवा पिढीचे लाडके गायक महेश काळे यांचे.

दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळीच्या प्रकाशपर्वानिमित्त इंडिया गेटच्या परिसरात महेश काळे यांच्या गायनाचा कर्यक्रम विलक्षण रंगला. दिल्लीच्या गुलाबी थंडीतही हजारो मराठी रसिकांनी गर्दी केली होती. एडविन बेकर व ल्यूटन्स या द्वयीने सुमारे शतकापूर्वी निर्मिलेल्या व एरवी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत असणाऱ्या इंडिया गेटच्या परिसराला आज या युवा गायकाच्या सुरांचे तोरण लागले. सकाळी साडेसहा ते दहा अशी सुमारे साडेतीन तास ही मैफल रंगली. सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्यसभा खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे आणि नरेंद्र जाधव, भाजप उपाध्यक्ष श्‍याम जाजू, माजी राजदूत वाकणकर, मेजर जनरल हसबनीस आदींसह सर्व क्षेत्रांतील मराठीजन आवर्जून हजर होते.

महेश काळे यांनी अहीर भैरव रागातील स्वरचित शीतल चलत पवन या मध्यलयीतील बंदिशीने कार्यक्रमाची सुरवात केली. "कट्यार काळाजात घुसली' या चित्रपटाबद्दल गायनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या काळे यांनी या चित्रपटातील "सूर निरागस हो', "घेई छंद मकरंद', "मनमंदिरा तेजाने', "अरुणी किरण गगनी चमके' ही गीते टाळ्यांच्या गजरात सादर केली. त्याचबरोबर त्यांनी "माझे जीवनगाणे', "अबीर गुलाल', "गोमू माहेरला जाते हो नाखवा', "निगार हो होशियार' आदी गीते गाऊन पं. अभिषेकी यांनाही स्वरमय आदरांजली वाहिली. या कार्यक्रमाचे निवेदन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केले. काळे यांना राजीव तांबे (हार्मोनियम), विभव खांडवकर (तबला), श्री. परांजपे (हार्मोनियम), सूर्यकांत सुर्वे (तालवाद्य), प्रसाद जोशी (पखवाज) आदींनी पूरक साथसंगत केली. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कार्यक्रमाच्या माध्यंतरात राज्यसभा खासदार डॉ. सहस्रबुद्धे व जाधव यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे वैभव डांगे यांनी सूत्रसंचालन केले.