भटक्‍या कुत्र्यांच्या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

वृत्तसंस्था
शनिवार, 8 एप्रिल 2017

कुटुंबियांनी शोध घेतल्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा भाताच्या शेतीत त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाभोवती भटके कुत्रे जमलेले होते. त्यांच्या चेहऱ्यावर खोल जखमा आणि उजवा हात शरीरापासून वेगळा झाला होता.

त्रिवेंद्रम (केरळ) - केरळमधील अत्तींगल येथे भटक्‍या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे कत्तीनपुरम येथील रहिवासी असलेले कुन्हीकृष्णन (वय 75) हे शुक्रवारी सकाळी दहा वाजता केस कापण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडले. मात्र त्यानंतर ते घरी परतले नाही. कुटुंबियांनी शोध घेतल्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा भाताच्या शेतीत त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाभोवती भटके कुत्रे जमलेले होते. चेहऱ्यावर खोल जखमा आणि उजवा हात शरीरापासून वेगळा झालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

भटक्‍या कुत्र्यांच्या जमावाने केलेल्या हल्ल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. मात्र, स्थानिकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे परिसरात यापूर्वी कधीही भटक्‍या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडलेली नाही. तर शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण समजेल, असे पोलिसांनी म्हटले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

टॅग्स