राहुल गांधींना काँग्रेसचे अध्यक्ष करा : मणिशंकर अय्यर 

पीटीआय
बुधवार, 22 मार्च 2017

पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी आमची आघाडी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करू शकेल. अर्थात, तो उमेदवार कोण असेल याची उत्सुकता आहेच! राहुल गांधी असे उमेदवार असू शकतील, अशी माझी आशा आहे. 
- मणिशंकर अय्यर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सपशेल पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत असतानाच पक्षाचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी 'राहुल गांधी यांना पक्षाचे अध्यक्ष करा' अशी मागणी केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या काँग्रेसला जनाधार मिळाला नाही. 

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना 'मेंटॉर' केले जावे, असा पर्याय अय्यर यांनी सुचविला. तसेच, राहुल यांची पदोन्नती लवकरच केली जाईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये काँग्रेसला सपशेल पराभवाच्या नामुष्कीला सामोरे जावे लागले. त्यानंतर राहुल यांच्या नेतृत्वावर अनेक राजकीय नेते आणि तज्ज्ञांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. 

'पीटीआय'ला दिलेल्या मुलाखतीत अय्यर म्हणाले, 'गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसची सूत्रे अनौपचारिकरित्या राहुल यांच्याच हाती आहेत. आता त्यांच्या या जबाबदारीला औपचारिक स्वरूप देण्याची वेळ आली आहे. यातून पक्षांतर्गत लोकशाही बळकट करण्याची राहुल यांची योजना त्यांना राबविता येईल.'' विशेष म्हणजे, लोकसभेपासून झालेल्या पक्षाच्या पराभवनंतर नेतृत्वबदलाची मागणी काँग्रेसमधूनही होऊ लागली आहे. 'राहुल यांचे नेतृत्व परिणामकारक आणि पुरेसे निर्णायक नाही,' असे मत ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी व्यक्त केले होते; तर 'आघाडीवर राहून नेतृत्व करायचे नसेल, तर राहुल यांनी पद सोडावे,' अशी मागणी केरळ युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष सी. आर. महेश यांनी केली होती. काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी पक्षात आमूलाग्र बदलांची गरज आहे, असे मत वीरप्पा मोईली आणि सत्यव्रत चतुर्वेदी यांनीही व्यक्त केले होते. 

सोनियांनी मार्गदर्शन करावे : अय्यर 
'राहुल यांना अध्यक्ष केल्यानंतर सोनिया गांधी यांची भूमिका काय असेल' या प्रश्‍नावर अय्यर म्हणाले, 'सोनिया यांची प्रकृत्ती उत्तम असेल, अशी मला आशा आहे. त्यांनी पक्षाच्या मार्गदर्शकाची भूमिका पार पाडावी. देशातील 70 टक्के जनता तरुण आहे. अजूनही काही वर्षे राहुल या तरुण पिढीचे प्रतिनिधी असतील. त्यामुळे त्यांच्या दृष्टिकोनातून पक्ष चालविण्याचे स्वातंत्र्य राहुल यांना मिळावे आणि सोनिया यांनी त्यांना मार्गदर्शन करावे.'' 

Web Title: Mani Shankar Ayyar demands Rahul Gandhi to be made full time Congress President