मणिपूर काँग्रेसची सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांना विनंती

वृत्तसंस्था
सोमवार, 13 मार्च 2017

कॉंग्रेस सत्ता स्थापन करण्यास यशस्वी ठरली तर इबोबी सिंह हे ईशान्य भारतातील पक्षाचे मोठे नेते म्हणून नावारूपास येतील भाजपची सरशी झाली तर पक्षाची स्थिती आणखी मजबूत होईल. 

मणिपूर : येथे काँग्रेस हा सर्वांत मोठा पक्ष म्हणून निवडून आला असून, सरकार स्थापनेसाठी काँग्रेसला निमंत्रित करावे अशी विनंती मणिपूरचे मुख्यमंत्री ओकराम इबोबीसिंह यांनी राज्यपालांना केली आहे.

इबोबीसिंह यांनी रविवारी रात्री उशिरा माध्यमांशी बोलताना सांगितले की, "मी राज भवनला गेलो आणि राज्यपाल नजमा हेप्तुल्ला यांना भेटलो. मी त्यांना विनंती केली की प्रथम काँग्रेसला सभागृहात बहुमत सिद्ध करण्याची संधी द्यावी, कारण काँग्रेस हा सर्वांत मोठा पक्ष आहे. राज्यपाल न्याय देतील अशी मला आशा आहे."

यावेळी मुख्यमंत्री इबोबीसिंह यांनी 27 काँग्रेस आमदारांना माध्यमांसमोरही उपस्थित केले. काँग्रेसचा आमदार श्यामकुमारसिंह भाजपमध्ये जाण्याचे वृत्त आहे. त्याबाबत विचारले असता ते म्हणाले, "आतापर्यंत कोणीही राजीनामा दिलेला नाही, त्यामुळे कोणतेही पक्षांतर झालेले नाही. संबंधित आमदार बहुमत चाचणीत सहभागी न झाल्यास घटनेचे उल्लंघन होईल."

कॉंग्रेस सत्ता स्थापन करण्यास यशस्वी ठरली तर इबोबी सिंह हे ईशान्य भारतातील पक्षाचे मोठे नेते म्हणून नावारूपास येतील भाजपची सरशी झाली तर पक्षाची स्थिती आणखी मजबूत होईल. गोवा आणि मणिपूरमध्ये कॉंग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला असला तरी या दोन्ही ठिकाणी त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे होती. पंजाबमधील मतदारांनी कॉंग्रेसला कौल दिला असून, स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे येथे कॉंग्रेसचा सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. मणिपूरवगळता इतर चारही राज्यांत मतदारराजाने प्रस्थापितांच्या विरोधात कौल दिला आहे. 

मणिपूरमध्ये निकाल जाहीर होताना सुरवातीपासूनच चुरस होती ती शेवटपर्यंत कायम राहिली. बहुमतासाठी आवश्‍यक असलेला 31 जागांचा टप्पा कुठल्याही पक्षाला गाठता आला नसला तरी कॉंग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने मणिपूरमध्ये चांगली कामगिरी केली असून, 21 जागांसह तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांनी दहा हजारपेक्षा अधिक मतांनी विजय संपादन केला. त्यांच्या विरोधातील उमेदवार सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांना अवघ्या 90 मतांवर समाधान मानावे लागले.