पर्रीकरांनी जिंकला 'विश्वास'; काँग्रेसचा मात्र 'घात'

टीम ई सकाळ
गुरुवार, 16 मार्च 2017

"आमच्या बाजूने 23 आमदार होते. आमच्या बाजून 23 आमदार उभे राहिल्याचे आम्ही सिद्ध केले. विश्वासदर्शक ठराव 22-16 असा मंजूर झाला. परंतु, विधानसभा सभापतीही आमच्या बाजूने होते. त्यांच्यासह 23 जणांचा पाठिंबा मिळाला," असे पर्रीकर यांनी सांगितले. 

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज (गुरुवार) गोवा विधानसभेत इतर पक्ष व अपक्षांच्या आधारावर 22 आमदारांचा पाठिंबा असल्याचे सिद्ध करीत विश्वासदर्शक ठराव जिंकला. काँग्रेसचा मात्र जिंकून आलेल्या आमदारांकडूनच घात झाल्याने त्यांना 16 आमदारांचाच पाठिंबा असल्याचे दिसले.

दरम्यान, काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचे चिरंजीव विश्वजीत राणे यांनी सभात्याग करीत ते मतदानाला गैरहजर राहिले. त्यामुळे काँग्रेसचे 17 आमदार जिंकूनही त्यांच्या बाजूने केवळ 16 मते मिळाली. 

सर्वांत जास्त जागा जिंकूनही काँग्रेसने मुख्यमंत्रिपदासाठी तातडीने हालचाली केल्या नाहीत त्यामुळे विश्वजीत राणे नाराज आहेत. तसेच, काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये येण्याची इच्छा आपल्याकडे व्यक्त करीत असल्याचे काल म्हटले होते. 
"आमच्या बाजूने 23 आमदार होते. आमच्या बाजून 23 आमदार उभे राहिल्याचे आम्ही सिद्ध केले. विश्वासदर्शक ठराव 22-16 असा मंजूर झाला. परंतु, विधानसभा सभापतीही आमच्या बाजूने होते. त्यांच्यासह 23 जणांचा पाठिंबा मिळाला," असे पर्रीकर यांनी सांगितले. 

काँग्रेस गोव्यात सर्वांत मोठा पक्ष ठरूनही त्यांना सरकार बनवता आले नाही. राज्यपालांनी भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित केले. काँग्रेसने पर्रीकर यांचा शपथविधी रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तो राज्यपालांचा विशेषाधिकार असल्याचे सांगून न्यायालयाने काँग्रेसची याचिका निकालात काढली. त्यांना गुरुवारी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले होते. 

पर्रीकर यांनी राज्यपालांना भेटून आपल्याला 21 आमदारांचा पाठिंबा असल्याचे दाखवून सरकार स्थापनेचा दावा केला होता. त्यावर राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी पर्रीकर यांना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित केले होते. 
गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष यांचे प्रत्येकी 3, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक, तसेच अपक्ष रोहन खौंटे आणि भाजप पुरस्कृत अपक्ष गोविंद गावडे यांच्या पाठिंब्यावर भाजपने सत्तेच्या स्पर्धेत काँग्रेसला बाजूला ठेवले आहे.