गोवा काँग्रेसच्या फुटीला खतपाणी; राणेंचा राजीनामा

अवित बगळे 
गुरुवार, 16 मार्च 2017

सहकारी पक्षांवर जास्त अवलंबून राहावे लागू नये यासाठी भाजप बळकटीचे मार्ग पर्रीकर अवलंबणार हे स्पष्ट आहे. त्यातूनचकाँग्रेसच्या फुटीला खतपाणी मिळणार असल्याचे दिसत आहे.

पणजी : एकीकडे मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने विधानसभेत आज (गुरुवारी) विश्वासदर्शक ठराव जिंकला असतानाच दुसरीकडे काँग्रेसमध्ये फूट पडणे अटळ झाले आहे. विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला गेल्यानंतर मतदानावेळी काँग्रेसेचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांचे पुत्र आणि वाळपईचे आमदार विश्वजित राणे हे विधानसभेच्या बाहेर निघून गेले. त्यामुळे ठरावाच्या विरोधात काँग्रेसची केवळ सोळा मतेच पडली.

विधानसभेचे हंगामी सभापतिपद पणजीचे आमदार सिद्धार्थ कुंकळकर यांना शपथ देण्यास काल काँग्रेसने आक्षेप घेतला होता. काँग्रेसचे विधिमंडळ नेते चंद्रकांत कवळेकर यांनी ही नियुक्ती रद्द करावी अशी लेखी मागणी काल राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांच्याकडे केली होती. मात्र, आज काँग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांनी कुंकळकर यांच्याककडूनच आमदारकीची शपथ घेतली.

कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्य प्रभारी दिग्विजयसिंह यांनी विश्वजित राणे हे पर्रीकर यांच्यासोबत हॉटेलमध्ये काय करत होते असे जाहीरपणे विचारले. त्याला प्रत्युत्तर देताना पर्रीकर यांनी आपण कोणास भेटण्यास गेलो नव्हतो असे म्हटले होते. त्यापुढे काँग्रेसचे थिवीतील आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी गोव्यासारख्या छोट्या राज्यांत प्रत्येकजण एकमेकांचा जवळून ओळखत असल्याने फोन करणे वा भेटणे यातून केवळ राजकीय अर्थच काढला जाऊ नये असे विधान केले. यावरून काँग्रेसमध्ये विश्वजित यांना अन्य आमदारांचाही पाठिंबा असल्याचे दिसते.

विधानसभेत आज भाजपच्या बाजूने 22 मते पडली, त्यामुळे 40 सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेत भाजप आघाडीकडे पूर्ण बहुमत असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र सहकारी पक्षांवर जास्त अवलंबून राहावे लागू नये यासाठी भाजप बळकटीचे मार्ग पर्रीकर अवलंबणार हे स्पष्ट आहे. त्यातूनच काँग्रेसच्या फुटीला खतपाणी मिळणार असल्याचे दिसत आहे.

Web Title: manohar parrikar wins trust vote goa