'CRPF'वर हल्ला घडवून आणणाऱ्या माओवाद्याचा खात्मा

वृत्तसंस्था
सोमवार, 15 मे 2017

नारायणपूर जिल्ह्यातील छोटा डोंगर येथील विलास हा बस्तरमधील बरसूर भागात मागील दहा वर्षांपासून सक्रिय होता. त्याच्याविरोधात 18 खटले दाखल होते.

रायपूर : नक्षलग्रस्त छत्तीसगढमध्ये हाहाकार माजविणाऱ्या कुख्यात माओवाद्याला कंठस्नान घालण्यात अखेर पोलिसांना यश आले. छत्तीसगढ सरकारने ज्या माओवाद्याच्या शिरावर 16 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, त्याचा काल रात्री उशीरा केलेल्या कारवाईत पोलिसांनी खात्मा केला. 

विलास ऊर्फ कैलाश असे मारण्यात आलेल्या माओवाद्याचे नाव आहे. नारायणपूर जिल्ह्यातील छोटा डोंगर येथील विलास हा बस्तरमधील बरसूर भागात मागील दहा वर्षांपासून सक्रिय होता. त्याच्याविरोधात 18 खटले दाखल होते. बस्तर जगदलपूर येथे त्याला मारण्यात पोलिसांना यश आले. त्याला मारल्यानंतर घटनास्थळी त्याच्याकडील AK-47 बंदुक सापडली. पोलिसांनी ही बंदुक जप्त केली. 

बुरकालपल येथे माओवाद्यांनी पोलिसांच्या तळावर जेवणाच्या वेळी अचानकपणे केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 25 जवान हुतात्मा झाले होते. विलास हा या हल्ल्याचा प्रमुख सूत्रघधार होता. या कुख्यात माओवाद्याला ठार करणाऱ्या बस्तर पोलिसांच्या पथकाला 1 लाखांचे बक्षीस देण्यात आले.