ध्वनिक्षेपकावरून एकाच वेळी 'अजान'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 जून 2017

वालिया जुमा मशिदीने आपल्या सर्वांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला असून आता राजकीय पक्षांनीही त्याचे अनुकरण करावे.
- महंमद कोया, स्थानिक नागरिक

कोची - केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील बड्या मशिदीने ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी पुढाकार घेत आता दिवसातून केवळ एकाच वेळेस ध्वनिक्षेपकावरून अजान देण्याचा निर्णय घेतला आहे.

वालिया जुमा मशीद ही वझक्कड भागातील सर्वांत मोठी मशीद म्हणून ओळखल्या जाते. "वालिया जुमा'तून अजान झाल्यानंतर अन्य 17 मशिदी देखील याचा कित्ता गिरवतील पण हे करतानाही ध्वनी प्रदूषण होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल.वझक्कड भागामध्ये सातपेक्षा अधिक मशिदी असून त्यांच्या व्यवस्थापनानेही या निर्णयाचे स्वागत केले आहे. विविध मशीद समित्यांमध्ये झालेल्या करारान्वये सर्व धार्मिक कार्यक्रमांमध्ये होणारा ध्वनिक्षेपकाचा वापर पूर्णपणे थांबविण्यात येईल.

तत्पूर्वी या भागातील अनेक शाळा आणि रूग्णालयांच्या व्यवस्थापनाने मशिदीच्या भोंग्यांचा आम्हाला त्रास होत असल्याची तक्रार व्य केली होती असे महाल कौन्सिलचे अध्यक्ष टी.पी. अब्दुल अझीज यांनी सांगितले. आता "अजान'ची वेळ निश्‍चित करण्यासाठी पाच सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात आली असून ती कोझीकोड येथील काझींशी चर्चा करेल. दरम्यान "वालिया मशिदी'ने उचललेल्या पावलाचे विविध स्वयंसेवी, सामाजिक संस्था, संघटनांनी स्वागत केले आहे.

टॅग्स