जय शहा यांना वाचविण्यासाठी मंत्र्यांची धडपड का?

वृत्तसंस्था
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

  • जय शहा यांच्यावर सोशल मीडियातूनही टीका
  • जय शहा दाखल करणार मानहानीचा खटला

नवी दिल्ली : ऐकलंत का, देशाच्या एका नागरिकाची इज्जत वाचविण्यासाठी एक केंद्रीय मंत्री पत्रकार परिषद घेत आहेत. हेच का 'मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्सिमम गव्हर्नन्स'? अशा विविध प्रकारे टिपण्णी करत अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांच्या उत्पन्न वाढीवरून टीका होत आहे. 

जय शहा यांच्याबद्दलच्या बातमीवरून सोशल मीडियामधूनही शहा पिता-पुत्रांवर टीकेची झोड उठली आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे सुपुत्र जय शहा यांच्या व्यवसायाविषयी एका माध्यमाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या एका बातमीमुळे खळबळ उडाली असून, या प्रकरणी जय शहा संबंधित पत्रकार व संपादकाविरोधात 100 कोटींचा दावा दाखल करणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली.

यावरून निर्माण झालेल्या वादंगामुळे गोयल यांनी पत्रकार परीषद बोलवून याबाबतची माहिती दिली. 

गोयल म्हणाले, "सदरचे वृत्त हे निराधार व पूर्णपणे चुकीचे आहे. आमचे नेते अमित शहा यांना लक्ष्य करण्याचा व त्यांची बदनामी करण्याचा उद्देश यामागे असून, जय शहा सोमवारी सदरील माध्यमाचे संपादक व पत्रकाराविरोधात 100 कोटींचा दावा दाखल करतील. जय शहा यांनी बॅंकेकडून घेतलेले कर्ज व त्यांचा व्यवसाय हा पारदर्शी आहे.'' दरम्यान, या वृत्तानंतर कॉंग्रेस व विरोधी पक्षांकडून होणाऱ्या सर्व आरोपांचे गोयल यांनी खंडन केले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: marathi news bjp amit shaha son jay shah turnover