'बेकायदेशीररित्या पार्क केलेल्या वाहनांचे फोटो पाठवा आणि बक्षिस मिळवा'

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 नोव्हेंबर 2017

बेकायदेशीररित्या रस्त्यावर लावलेल्या वाहनांचे फोटो आपल्या मोबाईलवर काढा व तो तेथील संबंधित पोलिस स्थानकाला पाठवा. वाहन मालकाला 500 रूपये दंड होईल व त्यातील 10 टक्के रक्कम तक्रारदाराला दिली जाईल.

नवी दिल्ली : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी, 'चुकीच्या ठिकाणी पार्क केलेल्या वाहनांचे फोटो पाठवा आणि वाहन मालकांवर लावण्यात येणाऱ्या 500 रूपयांच्या दंडावरील 10 टक्के रक्कम बक्षिस म्हणून मिळवा.' अशी सूचना दिली.  

'मंत्रालयाबाहेर वाहनतळ नसल्याने राजदूत व इतर प्रतिष्ठित लोक संसदेच्या मार्गावरच वाहने लावतात व त्यामुळे संसदेकडे जाणाऱ्या रस्त्यावर अडथळा निर्माण होतो. ही गोष्ट फारच लाजिरवाणी आहे.' असे गडकरी म्हणाले. 

'मोटर वाहन कायद्यामध्ये, मी एक तरतूद करणार आहे. बेकायदेशीररित्या रस्त्यावर लावलेल्या वाहनांचे फोटो आपल्या मोबाईलवर काढा व तो तेथील संबंधित पोलिस स्थानकाला पाठवा. वाहन मालकाला 500 रूपये दंड होईल व त्यातील 10 टक्के रक्कम तक्रारदाराला दिली जाईल.' असे गडकरी यांनी सांगितले   

'बऱ्याच ठिकाणी वाहनतळांची सोय नाही. नागरिक त्यासाठी रस्ते वापरत आहेत. मोठमोठ्या संस्थांनी वाहनतळांची सोय करणे आवश्यक आहे. माझ्याकडे दररोज राजदूत, मान्यवर लोक येतात व संपूर्ण रस्त्यांवर वाहने लावलेली असतात त्यामुळे अडचण होते. वाहनतळ उभे करण्याची परवानगी मिळण्यासाठी मला 13 परवान्यांची आवश्यकता आहे व हा विषय मी तत्कालीन शहरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्याकडे उपस्थित केला आहे' असेही गडकरी यावेळी म्हणाले.

माझ्या मंत्रालयाच्या ऑटोमेटेड वाहनतळाच्या वेळीही परवाना मिळण्यासाठी मला नऊ महिने वाट पाहावी लागली होती. ऑटोमेटेड मल्टिलेव्हल पार्किंग सुविधा असणारी वाहतूक भवन ही पहिलीच सरकारी इमारत असणार आहे. यासाठी एकूण नऊ कोटींचा खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली.       
 

Web Title: Marathi news Click pics of illegally parked cars, get rewarded: Nitin Gadkari