गुजरातमध्ये पाटीदार आरक्षणावर काँग्रेसचे तीन पर्याय

पीटीआय
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

पाटीदार समाजाच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीवरून आरक्षणाच्या मुद्द्यावर काहीतरी तोडगा निघेल अशी आशा आहे.
- कपिल सिब्बल

अहमदाबाद- पाटीदार समाजाकडून करण्यात येत असलेली आरक्षणाची जोरदार मागणी लक्षात घेऊन काँग्रेसने पाटीदारांसमोर तीन पर्याय ठेवले आहेत. हार्दिक पटेल यांच्याय नेतृत्वाखालील पाटीदार आंदोलन समिती आणि काँग्रेस पक्षाची बैठक काल (बुधवार) रात्री पार पडली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत पाटीदार संघटनेच्या प्रतिनिधींनी त्यांच्या नेत्यांशी आणि कायदेतज्ञांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे काँग्रेसला सांगितले आहे. दरम्यान, हे तीन पर्याय कोणते याबाबत मोठी उत्सुकता आहे.

रात्री 11:30 पासून 2:00 वाजेपर्यंत चाललेल्या या बैठकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पाटीदार समितीसमोर तीन पर्याय ठेवले. "आम्हाला काँग्रेसकडून शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांसाठी आमच्या समाजाला कशा प्रकारे आरक्षण देता येईल याबाबत तीन पर्याय दिले आहेत," अशी माहिती बैठकीनंतर पाटीदार आंदोलन समितीचे प्रवक्ते दिनेश बंभानिया यांनी दिली. मात्र काँग्रेसकडून नेमके कोणते पर्याय देण्यात आले हे स्पष्ट करण्यात आले नाही.

"बैठकीत दिलेल्या पर्यायांवर आम्ही प्रथम हार्दिक पटेल यांच्यासह पाटीदार समाजाचे इतर नेते, तसेच कायदेतज्ञ यांच्याशी चर्चा करू. नंतर ते पर्याय आमच्या समाजासमोर मांडले जातील. जर समाजाने हे पर्याय स्वीकारले तर आम्ही काँग्रेसला आमचा निर्णय कळवू. गुजरातमध्ये सध्या अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या 49 टक्के आरक्षणाच्या मुद्दयाला काँग्रेसने सादर केलेल्या प्रस्तावात हात घातलेला नाही," असेही बंभानिया यांनी सांगितले. आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठी संविधानानुसार वैध न ठरणारा काँग्रेसचा एक प्रस्ताव आम्ही अमान्य केला, असेही बंभानिया यांनी सांगितले. 

"पाटीदार समाजाच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीवरून आरक्षणाच्या मुद्द्यावर काहीतरी तोडगा निघेल अशी आशा आहे. दोन-तीन दिवसांनी या विषयावर पुन्हा बैठक घेऊन चर्चा केली जाईल. आरक्षणाच्या सर्व मुद्द्यांचा विचार करून निर्णय घेऊ," असे सिब्बल यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :