शिक्षण संस्था बनल्या आहेत 'व्यापारी संस्था' 

पीटीआय
बुधवार, 5 जुलै 2017

हैदराबाद : ज्ञानदान करण्याऐवजी भारतामधील शिक्षण संस्था 'व्यापारी संस्था' बनल्या आहेत, अशी कठोर टीका ज्येष्ठ शास्त्रज्ञ जी. माधवन नायर यांनी आज केली आहे. शैक्षणिक संस्थांचा वापर राजकीय कार्यकर्ते निर्माण करण्याच्या राजकीय पक्षांच्या धोरणांवरही नायर यांनी सडकून टीका केली. 

जी. माधवन नायर हे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे माजी प्रमुख आहेत.

हैदराबाद : ज्ञानदान करण्याऐवजी भारतामधील शिक्षण संस्था 'व्यापारी संस्था' बनल्या आहेत, अशी कठोर टीका ज्येष्ठ शास्त्रज्ञ जी. माधवन नायर यांनी आज केली आहे. शैक्षणिक संस्थांचा वापर राजकीय कार्यकर्ते निर्माण करण्याच्या राजकीय पक्षांच्या धोरणांवरही नायर यांनी सडकून टीका केली. 

जी. माधवन नायर हे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे माजी प्रमुख आहेत.

'विद्यार्थ्यांना खरे शिक्षण दिले जात नसून त्यांना चमच्याने भरविले जात आहे. बहुतेक मूल्यांकन परीक्षा या ज्ञानाची चाचणी घेण्याऐवजी केवळ स्मरणशक्तीच्या चाचण्या झाल्या आहेत. अनेक शिक्षण संस्था केवळ व्यापारी संस्था बनल्या आहेत. त्यामुळेच शिक्षण यंत्रणा ढासळली आहे. याचाच परिणाम म्हणून पदवी घेऊनही विद्यार्थी बेरोजगार फिरत आहेत. त्यांना विषयाचे मूलभूत ज्ञानच नसते. शिकलेल्या विषयाचा प्रत्यक्षात कसा वापर करायचा हेही त्यांना माहीत नसते. ही अत्यंत चीड आणणारी परिस्थिती आहे,' असे मत नायर यांनी 'पीटीआय'शी बोलताना मांडले. नायर यांच्या मते, भारतातील अनेक खासगी शिक्षण संस्थांमध्ये पहिला बळी 'शिक्षणाच्या दर्जा'चा पडतो. या शिक्षण संस्थांना केवळ विद्यार्थी संख्या वाढविणे आणि पैसा कमाविणे, यातच रस असतो. 

देशातील आयआयटी आणि बंगळूरमधील भारतीय विज्ञान संस्थेने मात्र आपला दर्जा टिकविला असला तरी जागतिक पातळीवर येण्यासाठी त्यांनी अधिक प्रयत्न करावेत, असे माधवन नायर म्हणाले. 'शिक्षण आणि राजकारण यांची सरमिसळ कधीही करू नये. सध्या अनेक राजकीय पक्ष या शिक्षणसंस्थांचा वापर आपले कार्यकर्ते निर्माण करण्याची प्रयोगशाळा म्हणून करतात. हे थांबविले पाहिजे. राजकीय पक्षांनी आपला हेतू साध्य करण्यासाठी वेगळ्या राजकीय संस्थांची निर्मिती करावी,' असेही नायर म्हणाले. विद्वान लोक शिक्षणक्षेत्रात येत नाहीत आणि शिक्षकांना योग्य प्रशिक्षण दिले जात नाही, याचीही खंत त्यांनी व्यक्त केली. 

विद्यार्थ्यांची निरीक्षण, विश्‍लेषण आणि आकलन शक्ती वाढविणे हा शिक्षणाचा उद्देश असायला हवा. नैतिक मूल्यांचेही शिक्षण महत्त्वाचे आहे. हाच प्राथमिक शिक्षणाचा आधार आहे. हा पाया पक्का झाला की विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान मिळविण्याच्या मार्गावर मार्गदर्शन करावे. दहा हजार प्रश्‍नांची उत्तरे तोंडपाठ करून काय फायदा? 
- जी. माधवन नायर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ