विमानाच्या रद्द तिकिटावरील कर, अधिभाराचा परतावा द्या 

पीटीआय
शनिवार, 10 जून 2017

विमानाचे तिकीट रद्द केल्यानंतर प्रवाशांना कर व अधिभाराचा परतावा न देणाऱ्या विमान कंपन्यांवर कारवाई करण्याचा इशारा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री गजपती राजू यांनी शुक्रवारी दिला. 

मुंबई - विमानाचे तिकीट रद्द केल्यानंतर प्रवाशांना कर व अधिभाराचा परतावा न देणाऱ्या विमान कंपन्यांवर कारवाई करण्याचा इशारा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री गजपती राजू यांनी शुक्रवारी दिला. 

गजपती राजू यांनी ट्विटरवर हा इशारा दिला आहे. विमानाच्या रद्द केलेल्या तिकिटावरील कर आणि अधिभाराचा परतावा विमान कंपन्या प्रवाशांना देत नाहीत. हा प्रकार नागरी हवाई वाहतूक महासंचलनालयाच्या नियमांच्या विरोधात आहे. विमान तिकीट रद्द केल्यानंतर प्रवाशांना परतावा मिळत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. तिकिटावरील सरकारी कर आणि अधिभाराचे सर्व पैसे कोणत्याही स्थितीत प्रवाशाला परत मिळायला हवेत. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विमान कंपन्या आणि पर्यटन संकेतस्थळांवर कारवाई करण्यात येईल, असे राजू यांनी ट्विटरवर म्हटले आहे. 

नागरी हवाई वाहतूक महासंचलनालयाने गेल्या वर्षी तिकीट रद्द करण्याचे नियम प्रवाशांना फटका बसणार नाही, असे बनविले आहेत. तसेच, विमानाच्या रद्द तिकिटाच्या परताव्याचे स्पष्ट तपशील प्रवाशाला द्यावेत आणि यात कोणतीही संदिग्धता ठेवू नये, असा नियम करण्यात आला आहे.