'याद राखा, नाही तर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू'

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

या कारवाया करण्याचे इतर मार्गही आहेत. त्यामुळे नंतरचे सर्जिकल स्ट्राईक तशाच पद्धतीने होतील असे नाही.
- जनरल बिपीन रावत

नवी दिल्ली : मागील वर्षी पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेले सर्जिकल स्ट्राईक हे पाकिस्तानला एक संदेश देण्यासाठी होते. मात्र, या शेजारी देशाचं वर्तन सुधारलं नाही तर पुन्हा अशाच प्रकारचे सर्जिकल स्टाईक केले जातील, असे स्पष्ट करत भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी पाकला सज्जड दम भरला आहे. 

शिव अरूर आणि राहुल सिंह यांनी लिहिलेल्या 'इंडियाज् मोस्ट फीअरलेस : ट्रू स्टोरीज ऑफ मॉडर्न मिलिटरी हीरोज' या पुस्तकाचे प्रकाशन जनरल रावत यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. 

जनरल रावत म्हणाले, "आम्हाला पाकला द्यायचा होता तो संदेश सर्जिकल स्ट्राईकद्वारे दिला आहे. त्यांना ही भाषा समजली असेल असे आम्हाला वाटते. गरज पडली आणि विरुद्ध बाजूने चांगलं वर्तन केलं गेलं नाही, तर अशा प्रकारच्या कारवाया आम्ही सुरू ठेवू." परंतु, या कारवाया करण्याचे इतर मार्गही आहेत. त्यामुळे नंतरचे सर्जिकल स्ट्राईक तशाच पद्धतीने होतील असे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

सीमारेषेलगत वाढत असलेल्या घुसखोरबद्दल रावत म्हणाले, "दहशतवादी येत राहतील, आम्ही त्यांना भिडू आणि गाडून टाकू. सर्जिकल स्ट्राईक्सनंतर राष्ट्रहिताचे निर्णय घेण्यास आम्ही आणखी सक्षम झालो आहोत."
दरम्यान, एके दिवशी जवानांच्या शौर्याच्या व्यक्तिगत कथादेखील शाळांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट होतील, अशी आशा रावत यांनी व्यक्त केली.