गोरखपूरचे हॉस्पिटल नव्हे; कत्तलखाना : जन्मदात्यांचा आक्रोश

वृत्तसंस्था
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

'मी माझ्या हाताने बाळासाठी पाच तास रेस्क्युरेटर वापरला,' गुप्ता सांगतात. ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळेच डॉक्टरांनी गुप्तांच्या बाळासाठी व्हेन्टिलेटर दिला नाही, अशी त्यांना आता खात्री वाटते आहे. बारसे व्हायचे आधीच गुप्तांचे बाळ निनावी मरण पावले.

गोरखपूरः श्रीकिशन गुप्तांचे चार दिवसांचे बाळ आजारी पडले तेव्हा त्यांनी गुरूवारी सकाळी गोरखपूरच्या सर्वात मोठ्या हॉस्पिटलमध्ये आधी धाव घेतली. डॉक्टरांनी अतिदक्षता विभागात बाळाला दाखल केले. त्याचवेळी डॉक्टरांनी गुप्तांना सांगितले, की विभागात सध्या एकही व्हेन्टिलेटर्स उपलब्ध नाही. 

'मी माझ्या हाताने बाळासाठी पाच तास रेस्क्युरेटर वापरला,' गुप्ता सांगतात. ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळेच डॉक्टरांनी गुप्तांच्या बाळासाठी व्हेन्टिलेटर दिला नाही, अशी त्यांना आता खात्री वाटते आहे. बारसे व्हायचे आधीच गुप्तांचे बाळ निनावी मरण पावले. 

गुरूवार आणि शुक्रवार या अवघ्या दोन दिवसांत मरण पावलेल्या तब्बल 64 बाळांमध्ये गुप्तांच्या बाळाचा समावेश होता. बाबा राघव दास वैद्यकीय रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडरअभावी झालेले हे जणू अमानूष हत्याकांड. नोबेल विजेते बालहक्क कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी यांनी नेमका हाच शब्द वापरला आहे. 

'ही दुर्घटना नाही. हे हत्याकांड आहे. गेल्या सत्तर वर्षांत आपण स्वातंत्र्य म्हणून आपल्या मुलांना हेच देऊ केले?,' सत्यार्थी यांनी संतापून विचारले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे, असेही सत्यार्थी यांनी म्हटले आहे. 

बालके दगावल्याची बातमी हेडलाईन बनू लागताच लखनौहून आदित्यनाथ यांनी आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ आणि शिक्षणमंत्री आशुतोष टंडन यांना तातडीने गोरखपूरला पाठविले आहे. गोरखपूर लोकसभा मतदारसंघ हा आदित्यनाथ यांचा गेली दोन दशके बालेकिल्ला आहे. 

मंत्र्यांनी दखल घेईपर्यंत खूप उशीर झाला आहे, असे श्रीकिशन गुप्ता यांना वाटते आहे. हॉस्पिटलपासून 25 किलोमीटरवर आपल्या घरी विमनस्क बसलेले गुप्ता अतिदक्षता विभागात झालेला भीषण प्रकार आणि एकापाठोपाठ एक दगावणारी मुले आठवून शहारतात. 

'ते मेडिकल कॉलेज नाही; कत्तलखाना आहे,' गुप्ता 'एनडीटीव्ही' वाहिनीशी बोलताना म्हणाले. 'मुलं मरत असताना हॉस्पिटलच्या प्रशासनाने अजिबात धावपळ केली नाही. दोन मुले माझ्या डोळ्यादेखत गेली...', गुप्ता यांनी सांगितले. 

हॉस्पिटलच्या रेकॉर्डनुसार, गुरूवारी संध्याकाळी सहा तासात नऊ मुले दगावली. त्याआधी दुपारपर्यंत 14 मुले दगावली होती.