धक्कादायक! डासांच्या चाव्यामुळे दरवर्षी दगावतात लाखो लोक

यूएनआय
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

काय आहेत डेंगीची लक्षणे : 
या डासाने चावा घेतल्याने 4 ते 10 दिवसांमध्ये संबंधित व्यक्तीला अतिताप, काही प्रमाणात डोकेदुखी, डोळ्यांच्या मागील बाजूस वेदना होणे, सांधेदुखी यांसारखे आजार जाणवू लागतात. तसेच जास्त प्रमाणात अशक्तपणा येतो. शरीराच्या तापमानात कमी, दुखणे, उलट्या, श्वसनास अडचणी, रक्ताच्या उलट्या यांसारखे त्रास जाणवू लागतात. त्यामुळे ही सर्व लक्षणे आढळल्यानंतर त्वरीत उपचार घ्यायला हवेत. वैद्यकीय उपचार घेण्यासाठी 24 ते 48 तास खूप धोकादायक असतात.  

कोलकता : डास चावल्यामुळे जगभरात दरवर्षी लाखो लोक मृत्युमुखी पडत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. डेंगीचा प्रादुर्भाव 128 हून अधिक देशांमध्ये झाला असून, 3 कोटी 90 लाख लोकांना डेंगीच्या आजाराचा संसर्ग होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे डास हा जगातील सर्वांत घातक प्राणी असून, तो माणसांसाठी अत्यंत धोकादायक ठरत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

डासांच्या चाव्यामुळे देशभरात सध्या धोकादायक आजार पसरत आहेत. डेंगी, चिकनगुनिया, झिका आणि ताप यांसारख्या गंभीर आजाराने भीतीचे वातावरण पसरले आहे. पृथ्वीवरील निम्म्याहून अधिक लोक ज्या भागात राहतात तिथे डासांच्या आळ्या आढळून येतात व तिथे डासांची पैदास होते. डासांच्या विविध प्रजाती असून, यातील काही प्रजातीतील डासांच्या चाव्यामुळे गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता आहे. एडिस डासांच्या चाव्यामुळे चिकनगुनिया, डेंगी, ताप आणि झिका यांसारखे विविध आजार होण्याची चिन्हे आहेत. यासारख्या गंभीर आजाराच्या बचावासाठी डासांवर नियंत्रण मिळवण्याचे आव्हान आहे.

डेंगी हा आजार प्रामुख्याने एडिस इजिप्ती डास चावल्यामुळे होतो. एडिस इजिप्ती डासाच्या मादीने चावा घेतल्याने डेंगीचे विषाणू माणसाच्या शरीरात पसरतात. त्यामुळे डेंगीची बाधा होण्याची दाट शक्यता असते. एडिस इजिप्ती डास हा मुख्यत: दिवसा चावा घेतो. त्यामुळे नागरिकांनी याची काळजी घ्यायला हवी. या डासाच्या चाव्यामुळे आशियातील काही आणि दक्षिण अमेरिकेतील देशांमधील अनेक बालके दगावली आहेत. पुढील धोका आणि मृत्यू टाळण्यासाठी याची लक्षणे आढळल्यानंतर लवकरात लवकर उपचार घेणे आवश्यक असते. निवडक देशांमध्ये राष्ट्रीय नियामक प्राधिकरणाअंतर्गत या आजारावर लस देण्याचे परवाने देण्यात आले आहेत. त्यानुसार 9 ते 45 वयोगटातील व्यक्तींना लस देता येऊ शकते. घराजवळ डासांची पैदास होण्यास पुरक जागा असल्यास चिकुनगुनियाचा संसर्ग होण्याचा धोकाही बळावतो.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :