'आम्ही लेस्बियन', शाळेने विद्यार्थिनींकडून लेखी घेतले  

School-build
School-build

कोलकाता - कमला गर्ल्स स्कूल या शाळेतील दहा विद्यार्थिनींकडून 8 मार्च रोजी शाळेच्या मुख्याध्यापिकेने 'आम्ही लेस्बियन आहोत' असे कागदावर लेखी घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे पालकांमध्ये नाराजी असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालक करत आहेत.

''आम्ही लेस्बियन असून, आम्ही शाळेत मुलींसोबत असभ्य वर्तन केले'', असे बळजबरीने लेखी घेतल्याचा आरोप एका विद्यार्थिनीने केला. तसेच शाळा प्रशासनाने 12 मार्च रोजी पालकांना शाळेत बोलावून घेतले. ''मुख्याध्यापिकेच्या कक्षात मुलींनी दिलेला कबुलीजबाब आमच्या हाती देण्यात आला. हा सगळा प्रकार धक्कादायक होता. आमच्या मुलींनी जे कृत्य केलेच नव्हते, त्याचा कबुलीजबाब घेण्यात आला'' असे पालकांचे म्हणणे आहे. 

शाळेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींना शिस्त लागावी यासाठी ही शिक्षा देण्यात आली. या मुली वर्गात मस्ती करत होत्या. त्यामुळे मुख्याध्यापिकेने मुलींना बोलावून त्यांच्याकडून लिहून घेतले, पालकांनाही शाळेत बोलावून त्यांच्या मुलींनी केलेल्या कृत्याची माहिती देण्यात आली.

दरम्यान, शाळेच्या मुख्याध्यापिका शिखा सरकार यांनी देखील माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ''त्या दहा मुलींनी शाळेत असभ्य वर्तन केले होते. त्यांनी चूक मान्य केली असून, त्यांनी केलेले कृत्य गंभीर स्वरुपाचे होते, म्हणूनच आम्ही मुलींकडून ते पत्र लिहून घेतले'', असे त्यांनी सांगितले. 

असे असले तरी समाजसेवी संघटनांनी मात्र या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. समलैंगिकांविरोधात समाजाची मानसिकता यातून दिसून येते, असे समाजसेवी संघटनांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com