भारत-चीन सैन्यात स्वातंत्र्यदिनी धक्काबुक्की, दगडफेक; व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था
रविवार, 20 ऑगस्ट 2017

इंडोतिबेटन सीमा पोलिस दलाच्या (ITBP) जवानांनी त्यांना कारवाईचा इशारा दिला. मात्र, त्या आडमुठ्या चिनी सैनिकांनी भारतीय जवानांवर थेट दगडफेक करायला सुरवात केली.

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यदिन देशभरात साजरा होत असतानाच १५ ऑगस्ट रोजी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. ही धक्काबुक्की होत असताना दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये दगडफेकही झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, अशा प्रकारची धक्काबुक्की वा दगडफेक झालीच नसल्याचा दावा चीनने केला आहे.

चीनचे सैन्य दगडफेक करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्या ठिकाणी 50 पेक्षा अधिक सैनिक दिसत आहेत. त्यामधील एका सैनिकाच्या हातात चीनचा झेंडाही असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये सरोरवराचे पाणीही दिसत आहे. हा व्हिडिओ लडाखमधील असल्याचा दावा केला जात आहे.

लडाखमध्ये १५ ऑगस्टच्या सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पानगोंग सरोवराच्या किनाऱ्यावरून भारतीय हद्दीत घुसण्यासाठी चीनचे १५ सैनिक प्रयत्नशील होते. या सरोवराचा 66 टक्के भाग चीनच्या ताब्यात आहे, तर एक तृतीयांश भाग भारताच्या नियंत्रणाखाली आहे. चिनी सैन्याचा गट भारतीय हद्दीच्या दिशेने सरकत असल्याचे लक्षात येताच सीमेवरील भारतीय जवानांनी त्यांना रोखले. तिथून परत जाण्याचा इशारा त्यांनी दिला. मात्र, अनेकदा इशारा देऊनही चिनी सैनिक तिथून हटण्यास तयार नव्हते.

दरम्यान, चिनी सैनिक भारतीय हद्दीत घुसले. इंडोतिबेटन सीमा पोलिस दलाच्या (ITBP) जवानांनी त्यांना कारवाईचा इशारा दिला. मात्र, त्या आडमुठ्या चिनी सैनिकांनी भारतीय जवानांवर थेट दगडफेक करायला सुरवात केली. या चिनी कुरघोडीला भारतीय सैनिकांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. यामध्ये दोन्ही ठिकाणचे जवान किरकोळ जखमी झाल्याचे सूत्रांनी सांगितले.