रजनीकांत यांनी राजकारणात येऊ नये; अन्यथा.. : स्वामी

वृत्तसंस्था
शनिवार, 24 जून 2017

'रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार' अशा चर्चा गेली अनेक वर्षे सुरू आहेत. पण अलीकडच्या काळात रजनीकांत यांनीही सूचक वक्तव्ये करत राजकारण प्रवेशाचे संकेत दिले होते. किंबहुना, 'मी विविध पर्यायांची चाचपणी करत आहे आणि एकदा निर्णय पक्का झाला, की घोषणा करेन' असे रजनीकांत यांनी गुरुवारी सांगितले होते. त्यामुळे नजीकच्या भविष्यात रजनीकांतही राजकारणामध्ये दाखल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. 

चेन्नई : दक्षिणेतील 'सुपरस्टार' रजनीकांत यांनीच स्वत:च्या राजकारणातील प्रवेशाचे संकेत दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी काल (शुक्रवार) त्यांच्यावर सनसनाटी आरोप केला. 'रजनीकांत हे मोठ्या आर्थिक गैरव्यवहारामध्ये गुंतलेले आहेत. त्यांनी राजकारणात उतरू नये' असा 'सल्ला' स्वामी यांनी दिला. 

स्वामी यांनी 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये रजनीकांत यांच्यावर निशाणा साधला. 'रजनीकांत यांनी खरोखरीच राजकारणात प्रवेश केला, तर दडवून ठेवलेली अनेक गुपिते बाहेर येतील. ते त्यांच्यासाठी अडचणीचे होईल. त्यामुळे रजनीकांत यांनी राजकारणात येऊ नये, असे मला वाटते', असा सल्ला त्यांनी या मुलाखतीतून दिला. 'रजनीकांत राजकारणासाठी 'अनफिट' आहेत' असे मतही स्वामी यांनी नोंदविले. 

'रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार' अशा चर्चा गेली अनेक वर्षे सुरू आहेत. पण अलीकडच्या काळात रजनीकांत यांनीही सूचक वक्तव्ये करत राजकारण प्रवेशाचे संकेत दिले होते. किंबहुना, 'मी विविध पर्यायांची चाचपणी करत आहे आणि एकदा निर्णय पक्का झाला, की घोषणा करेन' असे रजनीकांत यांनी गुरुवारी सांगितले होते. त्यामुळे नजीकच्या भविष्यात रजनीकांतही राजकारणामध्ये दाखल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. 

गेल्या मेमध्येही रजनीकांत यांनी त्यांच्या चाहत्यांच्या मेळाव्यामध्ये भाषण करताना राजकारण प्रवेशाबद्दल भाष्य केले होते. 'देवाची इच्छा असेल, तर मी राजकारणात येईन. मी राजकारणात आलो, तर 'वाईट' घटकांपासून दूर राहीन', असे रजनीकांत यांनी सांगितले होते. 'रजनीकांत भाजपमध्ये प्रवेश करतील' अशीही अटकळ काही राजकीय तज्ज्ञांनी बांधली होती. रजनीकांत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध सौहार्दाचे असल्याने ही चर्चाही काही काळ रंगली होती. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी रजनीकांत यांना पक्षप्रवेशाचे निमंत्रणही दिले होते, अशा आशयाचे वृत्तही काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले होते. 

स्वतंत्र पक्ष स्थापन करणार? 
जयललिता यांच्या निधनामुळे तमिळनाडूच्या राजकारणामध्ये पोकळी निर्माण झाली आहे. जयललिता यांचे कट्टर विरोधक करुणानिधीही आता नव्वदीमध्ये आहेत. तमिळनाडूमध्ये व्यक्तिकेंद्रीत राजकारणाचे प्राबल्य असल्यामुळे 'जयललिता आणि करुणानिधी यांच्यानंतर कोण?' हा प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागला आहे. ही राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी भाजप आणि इतर राष्ट्रीय पक्षही प्रयत्नशील आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून रजनीकांत यांच्या संभाव्य राजकारण प्रवेशाकडे पाहिले जात आहे. 

मात्र, गेल्या महिन्यात प्रसिद्ध झालेल्या काही बातम्यांनुसार येत्या ऑक्‍टोबरमध्ये रजनीकांत स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत. यासाठी त्यांची तयारीही सुरू झाले असल्याचेही त्या बातम्यांमध्ये नमूद करण्यात आले होते.