दलितविरोधाचा ठपका पुसून टाका; मोदी-शहांचा सरचिटणीसांना आदेश 

File photo of Narendra Modi and Amit Shah
File photo of Narendra Modi and Amit Shah

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी काल (ता. 11) रात्री पक्षाचे वरिष्ठ नेते व सरचिटणीसांशी रात्रीच्या जेवणावळीच्या निमित्ताने खलबते केली. कोरेगाव भीमा दंगलीनंतर भाजपच्या विरोधात दलित विरोधाचा ठपका ठेवून जाणीवपूर्वक दुष्प्रचार केला जात आहे तो हाणून पाडा, अशी सूचना मोदींनी केल्याचे समजते.

या वेळी कर्नाटक व त्रिपुरासह यंदाच्या वर्षी होणाऱ्या पाच मोठ्या राज्यांच्या निवडणुका व लोकसभा निवडणुकीच्या प्रचार रणनीतीबाबत मुख्यत्वे चर्चा झाली. या 'डिनर डिप्लोमसी'साठी निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या राज्यांसह काही प्रदेश सरचिटणीसांनाही बोलावून घेण्यात आले होते. 

भाजपचे शतक हुकलेल्या गुजरात निवडणुकीचा धडा घेऊन आगामी निवडणुकांची तयारी पक्षनेतृत्वाने आतापासूनच सुरू केली आहे. त्या दृष्टीने एक भाग म्हणून पंतप्रधान निवासस्थानी पक्षनेत्यांची ही बैठक बोलावण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार आगामी निवडणुकांसाठी पक्षाने जे 'मिलेनियम व्होट कॅम्पेन' नावाचे मोबाईल ऍप्लिकेशन वापरात आणण्याचे ठरविले आहे, त्याबद्दल नेत्यांना माहिती देण्यात आली. 

कोरेगाव भीमा दंगलीनंतर भाजपच्या विरोधात देशभरातील दलितांमध्ये नाराजी वाढू लागल्याचे फीडबॅक पक्षनेतृत्वापर्यंत आले आहेत. हा 'सांगावा' भलताच गंभीर असल्याचे लक्षात आलेल्या मोदींनी वरील सूचना केल्याची माहिती समजते. महाराष्ट्रातील घटनांननंतर संघपरिवार व भाजप दलितविरोधी असल्यावर शिक्कामोर्तब होण्याचे वातावरण तयार झाले असताना पंतप्रधानांची ही टिप्पणी महत्त्वपूर्ण मानली जाते. 

या बैठकीस पक्षाचे संघटन सचिव व वरिष्ठ नेते हजर होते; मात्र कोणालाही मोबाईल व सचिवांना बरोबर नेण्यास परवानगी नव्हती. पंतप्रधान मोदी साधारणतः वर्षाच्या सुरवातीला ज्येष्ठ नेते व खासदारांसाठी रात्रीची जेवणावळ ठेवतात. या वेळेस मात्र पक्षाच्या सरचिटणीसांना विशेषत्वेकरून बोलावून घेण्यात आले होते. केंद्र सरकारच्या म्हणजेच मुख्यतः मोदींच्या विविध कल्पक योजना व त्यांची राज्याराज्यांतील प्रगती याचा आढावा या वेळी स्वतः मोदींनी घेतल्याची माहिती आहे. 

कर्नाटकवर लक्ष केंद्रित 
यंदा ज्या राज्यांत निवडणुका होणार आहेत त्यात भाजपकडे नसलेले एकमेव मोठे राज्य कर्नाटक आहे. याशिवाय ईशान्येत त्रिपुरा व मेघालयाची निवडणूक आहे. कर्नाटक निवडणुकीच्या अगोदर मोदी सरकार आपले अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्याबाबतही पक्षनेत्यांकडून आज राज्यनिहाय अपेक्षा-सूचना मागविण्यात आल्याचे पक्षसूत्रांनी नमूद केले.

आजच्याही बैठकीत कर्नाटक, मेघालय, त्रिपुराबरोबरच मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडच्या निवडणुकांचाही विषय चर्चेला आला. या साऱ्या निवडणुकांत निर्भेळ विजय मिळवावाच लागेल व त्याच पायावर 2019 मधील सत्तेच्या फेरआखणीची इमारत बांधणे शक्‍य होईल, असे मोदींनी संबंधित नेत्यांना बजावल्याचे समजते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com