महाराष्ट्रातील खासदार संसदेत 'खामोश'

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

मोदींच्या सूचनांनंतरही परिणाम शून्यच

तरुणांची वानवाच
संसदेतील उपस्थितीबाबत नोंद होण्यासाठी सभागृहाच्या दाराशी असलेल्या पुस्तिकेत सही करावी लागते. शंभर टक्के उपस्थित राहणाऱ्यांत सावंत, सुळे, किरीट सोमय्या, महाडिक, सुनील गायकवाड, हरिश्‍चंद्र चव्हाण, वनगा, गोपाळ शेट्टी, गावित, पटोले, बनसोडे हे भाजपचे; तर सुळे, सावंत, बारणे, महाडिक, राहुल शेवाळे या अन्य पक्षीय खासदारांचा समावेश आहे. संसदेमध्ये अधिक युवा चेहरे दिसावेत, असा भाजपचा आग्रह असतो. प्रत्यक्षात राज्यातील केवळ 5 खासदार तीस ते चाळीसच्या व सात जण पन्नास वर्षांच्या आतील आहेत. वनगा (73) व आनंद अडसूळ (70) हे सत्तरीचे; तर गजानन कीर्तीकर, खैरे हे साठीच्या पुढचे आहेत. तरुण खासदारांत शिवसेना आघाडीवर आहे.

नवी दिल्ली : संसदेच्या नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित करणे वा चर्चांमध्ये सहभागी होण्यात लोकसभेपेक्षा महाराष्ट्रातील राज्यसभा खासदारांनी लक्षवेधी कामगिरी केल्याचे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार फटकारल्यानंतरही सत्तारूढ पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांसह भाजप खासदार संसदेत पूर्णवेळ उपस्थित राहण्याबाबत उदासीनच दिसून येत आहेत. अर्थात, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्षही याबाबत कोठेच कमी नाहीत. या अधिवेशनात 100 टक्के उपस्थित राहणाऱ्यांत भाजपचे केवळ सात ते आठ खासदार आहेत. 48 पैकी 14 खासदारांनी मागच्या अधिवेशनात शंभर टक्के हजेरी लावल्याचे 'संसदीय अभ्यास संस्थेची (पीआरएस) आकडेवारी सांगते.

बोलताही येईना
राज्यातील 48 पैकी निवडक 15-16 मराठी खासदार या वेळीही संसदेत बोलण्याबाबत अग्रेसर होते. अरविंद सावंत, सुप्रिया सुळे, हीना गावित, भावना गवळी, श्रीरंग बारणे, पूनम महाजन-राव, धनंजय महाडिक आदी अपवाद वगळता आंध्र प्रदेश, पश्‍चिम बंगाल, ओडिशा, केरळ आदी राज्यांतील खासदारांच्या तुलनेत अनेक मराठी खासदार तीन वर्षांनंतर अजूनही संसदेत प्रभाव तर सोडाच; पण बोलण्यासाठीही ओळखलेच जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे. संसदीय अधिवेशनातील खासदारांच्या कामगिरीबाबत 'सकाळ'ला सविस्तर माहिती उपलब्ध झाली असून त्यातून हे चित्र समोर आले आहे.

चव्हाणांचा एक प्रश्‍न
बारणे यांनी या अधिवेशनात लेखी-तोंडी मिळून सर्वाधिक 51 प्रश्‍न उपस्थित केले. महाडिक (46), सुळे (45), गावित (42) यांचेही प्रश्‍न लक्षणीयरीत्या लागले आहेत. अशोक चव्हाण यांनी केवळ 1 प्रश्‍न उपस्थित केला तर जेमतेम एका चर्चेत ते सहभागी झाले. ते केवळ 33 टक्के म्हणजे सर्वांत कमी काळ संसदेत हजर राहिल्याचे दिसते.
रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीचे प्रमाण 67 टक्के असून, त्यांनी केवळ 7 प्रश्‍न विचारले आहेत; पण ते एकाही चर्चेत सहभागी झालेले नाहीत.

पटोलेंची उपस्थिती मोठी
शरद बनसोडे यांचे केवळ 7 प्रश्‍न या वेळी लागू शकले. पुण्याचे खासदार अनिल शिरोळे, नगरचे दिलीप गांधी, कृपाल तुमाने, चिंतामण वनगा, संसदेबाहेर विलक्षण सक्रिय असलेले हेमंत गोडसे आदी अनेक 'मौनी3 खासदारांतच गणले जातात. भाजपशी 'मनभेद' झालेले नाना पटोले यांची उपस्थिती दणदणीत असली तरी प्रश्‍न (19) व चर्चांत सहभाग (03) याबाबत तेही या वेळेस उदासीन दिसले.

राज्यसभेची आघाडी
राज्यसभा हे तसेही ज्येष्ठांचेच सभागृह असल्याने येथील अमर साबळे व संजय काकडे हे पन्नाशीच्या घरातले सदस्य येथील सर्वांत तरुण मराठी खासदार आहेत. डी. पी. त्रिपाठी (78), शरद पवार (75), हुसेन दलवाई (74) हे सत्तरीच्या पुढचे सदस्य आहेत. राज्यसभा हे सतत चालणारे सभागृह असल्याने हजेरी वगळता खासदारांनी विचारलेले प्रश्‍न व चर्चांतील सहभाग यांची एकत्रित माहिती संसदेतर्फे ठेवली जाते. या तिन्ही बाबतीत अजय संचेती, रजनी पाटील, दलवाई यांनी आघाडी कायम ठेवली आहे. डॉ. विनय सहस्रबुद्धे व वंदना चव्हाण यांचाही संसदेतील लक्षवेधी मराठी वक्‍त्यांत समावेश आहे. पी. चिदंबरम हे सर्वांत अल्प काळ सभागृहात हजर राहिले व त्यांनी नोटाबंदी वगळता एकाही चर्चेत भाग घेतलेला नाही.