राजकीय 'युद्धा'नंतर अहमद पटेल यांची अमित शहांवर मात! 

Ahmed Patel Amit Shah
Ahmed Patel Amit Shah

गांधीनगर/नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्यसभेच्या गुजरातमधील तीन जागांसाठीच्या निवडणूक नाट्यावर तब्बल सहा तासांनी मध्यरात्री पडदा पडला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अपेक्षेप्रमाणे विजयी झाल्या. काँग्रेसच्या दोन आमदारांची मते अवैध ठरवल्याने काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांचा विजय सुकर झाला. 

राज्यसभेसाठीच्या गुजरातमधील तीन जागांसाठी काल (मंगळवार) मतदान झाले. भारतीय जनता पक्षाकडून अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या रिंगणात होत्या, तर काँग्रेसतर्फे ज्येष्ठ नेते व सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल निवडणूक लढवत होते. काँग्रेसचे बंडखोर नेते बलवंतसिंह राजपूत यांनीही यात उडी घेतली होती. गुजरात विधानसभेच्या 181 आमदारांपैकी 176 जणांनी मतदान केले होते. यापैकी काँग्रेसची दोन मते बाद ठरल्याने प्रथम पसंतीची 44 मते मिळवणारा उमेदवार विजयी होणार, हे निश्‍चित झाले.

राज्यसभा निवडणुकीच्या नियमानुसार मतपत्रिका मतपेटीत टाकण्यापूर्वी पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधीला दाखवणे बंधनकारक असते. काँग्रेसचे भोलाभाई गोहील आणि राघव पटेल यांनी आपल्या मतपत्रिका भाजपच्या प्रतिनिधीला दाखवल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. हा वाद मुख्य निवडणूक आयुक्तांपर्यंत पोचला. प्रत्यक्ष मतदारांचे व्हिडिओ चित्रीकरण, भाजप आणि काँग्रेसच्या शिष्टमंडळांशी चर्चा, प्रत्यक्ष तरतुदींची तपासणी अशी प्रक्रिया झाल्यानंतर रात्री साडेअकरा वाजता गोहील आणि पटेल यांची मते अवैध ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मतमोजणीला प्रत्यक्षपणे सुरवात झाली. वास्तविक ही मतमोजणी सायंकाळी सहा वाजताच सुरू होणे अपेक्षित होते. 

अहमद पटेल हे सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार असल्याने या निवडणुकीला सोनिया गांधी विरुद्ध भाजप असे स्वरूप आले होते. बलवंतसिंह राजपूत यांच्यामुळे निवडणूक रंगतदार होणार हे निश्‍चित होते. काँग्रेसचे बंडखोर नेते शंकरसिंह वाघेला यांनी आधीच उघडपणे भारतीय जनता पक्षाला मतदान करणार असल्याचे जाहीर केले होते. मते फुटू नयेत म्हणून काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना आधी बंगळूरला नेले व नंतर आणंदमधील रिसॉर्टमध्ये त्यांना ठेवले. मतमोजणीला आज सकाळी सुरवात झाल्यापासून अमित शहा स्वतः विधिमंडळाच्या परिसरात उपस्थित होते. भाजपचे सभागृहात 121 सदस्य आहेत, तर काँग्रेसचे 51, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 व संयुक्त जनता दलाचा एक सदस्य, अपक्ष 1 आणि सहा जागा रिक्त आहेत. शंकरसिंह वाघेला यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या सहा आमदारांनी आधीच बंडखोरी केली होती. 

प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी "क्रॉस व्होटिंग' होऊ नये म्हणून दोन्ही पक्षांनी शक्‍य तेवढी खबरदारी घेतली होती. काँग्रेसचे बंडखोर आमदार राघव पटेल आणि भोलाभाई गोहील यांनी मतदानानंतर आपली मतपत्रिका अमित शहा यांना दाखविल्याचा आरोप काँग्रेसने केला. तसेच त्यांनी आपल्या मतपत्रिका दूरचित्रवाणी वाहिन्यांनाही दाखविल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. त्यामुळे या दोघांची मते रद्द करावीत, अशी काँग्रेसने मागणी केली होती, तर भाजपने काँग्रेसचे आमदार मिथेश गरसिया यांचे मतदान रद्द करण्याची मागणी केली होती. 

काँग्रेसच्या सात आमदारांनी "क्रॉस व्होटिंग' केल्याचे समजते. त्यात बंगळूरच्या रिसॉर्टमध्ये थांबलेल्या 44 आमदारांपैकी एका आमदाराचा समावेश होता. राघवजी पटेल, बोलाभाई गोहिल, धर्मेंद्र सिंह जडेजा, करमसिंह पटेल, महेंद्रसिंग वाघेला, सी. के. रावल, अमित चौधरी या सात आमदारांचा समावेश असल्याचे समजते. याशिवाय काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे शंकरसिंह वाघेला यांनी भाजपला मत दिले. विशेष म्हणजे रिसॉर्टमध्ये थांबलेल्या 44 आमदारांपैकी एक आमदार करमसिंह मकवाडा यांनी क्रॉस व्होटिंग करत पटेल यांच्याविरुद्ध मतदान केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com