आठ मंत्र्यांनी घेतली अमित शहा यांची भेट; मंत्रिमंडळात बदल होणार? 

वृत्तसंस्था
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली : आगामी गुजरात निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नरेंद्र मोदी मंत्रिमंडळातील आठ मंत्र्यांनी आज (गुरुवार) भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीमुळे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. 

नवी दिल्ली : आगामी गुजरात निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नरेंद्र मोदी मंत्रिमंडळातील आठ मंत्र्यांनी आज (गुरुवार) भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीमुळे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. 

या बैठकीचा मुख्य हेतू गुजरात निवडणूक हा असला, तरीही त्यामध्ये मंत्रिमंडळाची चर्चाही झाली असल्याचे संकेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले. 'आता आणखी जास्त काळ मी संरक्षण मंत्री राहणार नाही, अशी मला आशा आहे' अशा आशयाचा नर्मविनोद त्यांनी केला. जेटली यांच्याकडे सध्या अर्थ आणि संरक्षण या दोन्ही महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी आहे. याशिवाय गुजरात निवडणुकीसाठी प्रभारी म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी आहे. 

'अमित शहा यांच्याबरोबर झालेली बैठक गुजरात निवडणुकीपुरतीच मर्यादित होती', असे भाजपचे राज्यसभेचे खासदार भूपेंद्र यादव यांनी सांगितले. 'आम्ही केवळ गुजरात विधानसभा निवडणूक आणि गुजरातमधील विषय यांवरच चर्चा केली. इतर कोणताही विषय चर्चेत आला नाही', असे ते म्हणाले. 

मार्चमध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांना भाजपने गोव्याची जबाबदारी सांभाळण्यासाठी राज्यात पाठविले. त्यांच्याकडील संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी जेटली यांच्याकडे सोपविण्यात आली. अर्थ आणि संरक्षण या दोन्ही जबाबदारी महत्त्वाच्या आहेत आणि दोन्ही मंत्रालयांवर कामाचा प्रचंड बोजा आहे. याशिवाय, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री हर्ष वर्धन यांच्याकडे पर्यावरण आणि वन विभागाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मेमध्ये तत्कालीन पर्यावरण आणि वन विभाग मंत्री अनिल माधव दवे यांचे निधन झाले. त्यानंतर हा बदल झाला होता. 

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्यासाठी अर्ज दाखल करण्यापूर्वी वेंकय्या नायडू यांच्याकडील माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी स्मृती इराणी यांच्याकडे सोपविण्यात आली होती. इराणी यांच्याकडे वस्त्रोद्योग मंत्रालयाचीही जबाबदारी आहे.