पक्षांतर्गत निवडणूक होईल आणि मगच राहुल गांधी अध्यक्ष होतील..!

पीटीआय
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

भाजपच्या नेतृत्वाखालील 'एनडीए' सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे. देशातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. 'पुढील निवडणुकीतही भाजपचीच सत्ता येणार' हा गैरसमज 2019 मध्ये दूर होईल. कर्नाटकमधील आगामी विधानसभा निवडणुकीमध्येही भाजपचे सत्तेत पुनरागमन होणार नाही. या निवडणुकीत काँग्रेसलाच पूर्ण बहुमत मिळेल. 
- एम. वीरप्पा मोईली, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते 

हैदराबाद : 'पक्षांतर्गत लोकशाहीच्या माध्यमातून राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती होईल', असे सांगत पक्षाचे ज्येष्ठ नेते एम. वीरप्पा मोईली यांनी येत्या महिन्याभरातच हा बदल होण्याचे संकेत आज (शुक्रवार) दिले. 'पक्षाने जबाबदारी सोपविल्यास पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्यासाठी सज्ज आहे' असे वक्तव्य राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते. 

'राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेसच्या अध्यक्षपद सोपविले जाणार' अशा चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. 'राहुल यांच्याकडे धुरा सोपविणे हे पक्षासाठी 'गेम चेंजर' ठरेल', अशी आशा मोईली यांनी व्यक्त केली. 

मोईली म्हणाले, 'राहुल यांनी आता तातडीने अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारायला हवी. हेच काँग्रेससाठी आणि देशासाठी चांगले असेल. राहुल यांची बढती लांबत चालली आहे, असे पक्षातील प्रत्येकाला वाटत आहे. आता या निर्णयासाठी राहुल गांधी काँग्रेसमधील पक्षांतर्गत निवडणुकीची वाट पाहत आहेत. या निवडणुकीच्या प्रक्रियेतूनच राहुल गांधी पक्षाध्यक्ष म्हणून नियुक्त केले जातील.'' 

काँग्रेसमध्ये राज्यांमधील पक्षपातळीवरील निवडणूक प्रक्रिया या महिन्यात संपणे अपेक्षित आहे. त्यानंतर राष्ट्रीय पातळीवरील निवडणूक होईल. यामध्ये राहुल यांची अध्यक्षपदी निवड होण्याची शक्‍यता आहे. 'राहुल पुढील महिन्यात पक्षाची सूत्रे हाती घेतील का' या प्रश्‍नावर मोईली यांनी 'शक्‍यतो.. हो!' असे उत्तर दिले.